Local Crime Branch takes drastic action :जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू, वरली मटका जुगार व इतर बेकायदेशीर धंद्यांवर अंकुश आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत जुगाराच्या ७ तर दारूच्या ३ प्रकरणांमध्ये एकूण १० आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून २८ हजार ८२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जुगाराच्या ७ तर दारूच्या ३ कारवाया; जिल्हाभरात विविध ठिकाणी छापे
बुलढाणा : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू, वरली मटका जुगार व इतर बेकायदेशीर धंद्यांवर अंकुश आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत जुगाराच्या ७ तर दारूच्या ३ प्रकरणांमध्ये एकूण १० आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून २८ हजार ८२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके तयार करून विविध ठिकाणी छापेमारी करण्याच्या सूचना दिल्या.
या अनुषंगाने ११ मार्च २०२६ रोजी विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कारवाया करण्यात आल्या. धामणगाव बढे पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिंपळगाव देवी येथे वरली मटका जुगार खेळत असलेल्या आकाश कुवरसिंग राजपूत (३१, रा. कुन्हा ता. मोताळा) याला पकडून त्याच्याकडून रोख रक्कम व जुगार साहित्य असा २,९२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.बोराखेडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत फुली येथे रामदास जगदेव बोदडे (५५) याच्याकडून ३,७१५ रुपये, तर शेंबा खुर्द येथील ज्योतिराम तोताराम दाभाडे (६८) याच्याकडून १,८५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच शेगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत पुंजाजी शालीग्राम खंडागळे (४२) याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल असा ६,६४० रुपयांचा, तर राजाराम सखाराम तायडे (५२) याच्याकडून २,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तामगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत कवठळ येथे देवानंद मुरलीधर पाखरे (२५) याच्याकडून २,३१५ रुपये, तसेच संग्रामपूर बसस्थानक परिसरातून सुदामा ऊर्फ राजू गोविंदराव वानखडे (४४) याच्याकडून २,३५० रुपयांचा जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. या सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
याशिवाय अवैध दारू प्रकरणातही तीन कारवाया करण्यात आल्या. डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घाटबोरी येथे सिद्धार्थ सिताराम मोरे (६०) याच्याकडून २० लिटर हातभट्टी दारू व साहित्य असा २,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.नांदूरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अलमपूर येथे विठ्ठल भानुदास बगाडे (३८) याच्याकडून देशी-विदेशी दारूच्या ५३ बाटल्या व साहित्य असा २,३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच निमगाव बसस्थानकाजवळ आशिष शंकर इंगळे (२९) याच्याकडून ५१ बाटल्या व साहित्य असा २,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) व अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली सपोनि, यशोदा कणसे, पोउपनि, पंकज सपकाळे, सफौ. ओमप्रकाश सावळे, राजेंद्र अंभोरे, पोहेकॉ. राजेंद्र टेकाळे, अनुपकुमार मेहेर, दिगंबर कपाटे, एजाज खान, संजय भुजबळ, विजय पैठणे, मपोहेका, वनिता शिंगणे, पोकॉ. मंगेश सनगाळे, भारत जाधव, राजेंद्र गडकर पोकॉ. अमोल अंभोरे, वैभव मगर, राकेश नायडू, अमोल वनारे, अमोल शेजोळ, अजिज परसुवाले, मनोज खरडे, चापोहेकॉ. समाधान टेकाळे, चापोकॉ. शिवानंद हेलगे स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांचे पथकाने केली.दरम्यान, जिल्ह्यातील अवैध जुगार व दारू व्यवसायांवर आगामी काळातही अशाच प्रकारे कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

