Competition with private schools :ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेत सकारात्मक बदल घडवत पातूर पंचायत समिती अंतर्गत येणारी दिग्रस बु येथील जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय केंद्र शाळा संगणकीय शिक्षणाच्या माध्यमातून नवा आदर्श निर्माण करत आहे. दर्जेदार, तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणामुळे पालकांचा शाळेकडे वाढता ओढा दिसून येत असून प्रवेशासाठी चढाओढ सुरू झाली आहे, अशी माहिती मुख्याध्यापक संजय बरडे यांनी दिली.

दिग्रस बु येथे प्रवेशासाठी पालकांची चढाओढ
राहुल सोनोने
दिग्रस बु : ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेत सकारात्मक बदल घडवत पातूर पंचायत समिती अंतर्गत येणारी दिग्रस बु येथील जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय केंद्र शाळा संगणकीय शिक्षणाच्या माध्यमातून नवा आदर्श निर्माण करत आहे. दर्जेदार, तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणामुळे पालकांचा शाळेकडे वाढता ओढा दिसून येत असून प्रवेशासाठी चढाओढ सुरू झाली आहे, अशी माहिती मुख्याध्यापक संजय बरडे यांनी दिली.
इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रयोगशाळेत नियमित तासिका घेतल्या जात आहेत. निश्चित वेळापत्रकानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्यक्ष संगणक हाताळण्याची संधी दिली जाते. सुरुवातीला संगणकाचे प्राथमिक ज्ञान देत डिजिटल साक्षरतेची भक्कम पायाभरणी केली जाते. अभ्यासक्रमातील धडे संगणकाच्या माध्यमातून शिकवले जात असल्याने विद्यार्थ्यांची आकलनशक्ती व उत्सुकता वाढताना दिसत आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन चाचण्या कशा सोडवायच्या, संगणकीय परीक्षांची रचना कशी असते, याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी शिक्षकांनीही विशेष प्रशिक्षण घेतले असून आगामी शैक्षणिक वर्षापासून सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षांसाठी पूर्णपणे सक्षम केले जाणार आहे. पुढील सत्रापासून स्पर्धा परीक्षांची तयारीही संगणकाच्या माध्यमातून करून घेतली जाणार असल्याचे मुख्याध्यापक बरडे यांनी स्पष्ट केले.
नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून पालक माहिती घेण्यासाठी शाळेत भेट देत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण, डिजिटल सुविधा आणि विद्यार्थीकेंद्री उपक्रम यामुळे शाळेची प्रतिमा अधिक उंचावली आहे. या उपक्रमासाठी शिक्षक सुनील सदार, सदानंद ढोरे, दिगंबर बराटे, सौ. कविता धनोकार, कु. आरती नैताम व कु. स्नेहल अरखराव यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
दिग्रस बु येथील ही शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून विद्यार्थी विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत आहेत. शिक्षकवृंदाच्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे शाळेचे नाव तालुक्यात उज्ज्वल झाले आहे, असे मत गटशिक्षणाधिकारी प्रविण डाबेराव (पंचायत समिती, पातूर) यांनी व्यक्त केले.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

