Young farmer commits suicide : पातूर तालुक्यातील पार्डी येथील ३७ वर्षीय युवा शेतकरी संघपाल माणिक निखाडे यांनी सततची नापिकी, ओला दुष्काळ आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे विष प्राशन करून आत्महत्या केली.

राहुल साेनाेने
दिग्रस बु : पातूर तालुक्यातील पार्डी येथील ३७ वर्षीय युवा शेतकरी संघपाल माणिक निखाडे यांनी सततची नापिकी, ओला दुष्काळ आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे विष प्राशन करून आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, निखाडे यांच्या शेतीवर बँक कर्ज, गटाचे कर्ज तसेच खाजगी सावकारांचे कर्ज होते. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने कर्जफेडीची तीव्र विवंचना त्यांच्यासमोर उभी राहिली होती. या मानसिक ताणातून त्यांनी रविवारी, २८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास स्वतःच्या शेतात विष प्राशन केले.गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे दाखल करण्यात आले. मात्र पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २ ऑक्टोबर रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाचे भवितव्य अंधारमय झाले आहे.

