Zero development: “शहरात एक रुपयाचेही विकास काम न आणणाऱ्या आमदारांनी आम्हाला उपदेशाचे डोस पाजू नयेत,” असा थेट आणि खरमरीत इशारा माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांना दिला आहे.

मेहकर : “शहरात एक रुपयाचेही विकास काम न आणणाऱ्या आमदारांनी आम्हाला उपदेशाचे डोस पाजू नयेत,” असा थेट आणि खरमरीत इशारा माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांना दिला आहे.
काल आमदार खरात यांनी “नगराध्यक्षाच्या परवानगीशिवाय शहरात इकडचा खडाही तिकडे करू दिला जाणार नाही,” असे वक्तव्य करत विकास कामांबाबत कडक भूमिका मांडली होती. तसेच, परवानगीशिवाय भूमिपूजन करणाऱ्यांवर आणि संबंधित ठेकेदारांवर कारवाईचा इशाराही दिला होता.
यावर प्रत्युत्तर देताना कासमभाई गवळी म्हणाले की, शहरात सुरू असलेली बहुतांश विकासकामे ही तत्कालीन आमदार संजय रायमुलकर यांनी मंजूर करून आणलेली आहेत. “त्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.
गवळी यांनी नगरपरिषदेमधील राजकीय समीकरणांचाही उल्लेख केला. नगराध्यक्ष उबाठा गटाचे असले तरी काँग्रेसचे ११ आणि शिवसेना शिंदे गटाचे ९ असे एकूण २० नगरसेवक त्यांच्या विरोधात असल्याचा दावा त्यांनी केला. उपाध्यक्ष आणि सर्व सभापती आमच्या गटाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शासनाच्या नव्या आदेशानुसार नगराध्यक्षांना केवळ मासिक बैठक बोलावण्याचा अधिकार असून धनादेशांवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार नाही, हे नगराध्यक्ष आणि विद्यमान आमदारांनी लक्षात घ्यावे, असा टोला त्यांनी लगावला.
“नगरपालिकेत हस्तक्षेप करणार नाही,” असे पूर्वी सांगणारे आमदार खरात आता रोज हस्तक्षेप करत आहेत. यावरून नगराध्यक्ष कमकुवत असल्याचे दिसते, अशी टीकाही गवळी यांनी केली. “मी विरोधी पक्षाचा आमदार आहे,” हे कारण सांगत सव्वा वर्षे वेळ घालवण्यापेक्षा विकासकामे आणून दाखवावीत, आम्ही त्यांचे स्वागतच करू,” असे खुले आव्हान त्यांनी दिले.
मार्चनंतर कोट्यवधी रुपयांची विकासकामे प्रभागांसाठी आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच, दहा-बारा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा उपाध्यक्ष आलिम ताहीर व बांधकाम सभापती सुरेशतात्या वाळूकर यांच्या प्रयत्नांतून आठवड्यावर आणण्यात आल्याचा दावा केला. पेनटाकळी प्रकल्पाच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे कामही अंतिम टप्प्यात असून लवकरच शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करू, असे त्यांनी सांगितले. एकंदरीत, मेहकर नगरपालिकेतील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली असून आगामी काळात हा कलगीतुरा आणखी रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

