Four bovine bulls : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या चार गोवंशीय बैलांची सुटका करून त्यांना जीवदान देत पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई शनिवारी सायंकाळी गस्ती दरम्यान करण्यात आली.

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या चार गोवंशीय बैलांची सुटका करून त्यांना जीवदान देत पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई शनिवारी सायंकाळी गस्ती दरम्यान करण्यात आली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजू पोलीस पथक पोलीस स्टेशन परिसरात गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली की सांगळूद ते बोरगाव मंजू दरम्यान दोन इसम गोवंशीय बैलांची कत्तल करण्याच्या उद्देशाने ग्राम धोतर्डी मार्गे बैल हाकत घेऊन येत आहेत. त्यानुसार ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, पोलिस कर्मचारी शेखर कोद्रे व अक्षय देशमुख यांनी धोतर्डी येथील रेल्वे बोगद्याजवळ सापळा रचला.
दरम्यान, दोन इसम चार बैलांना एकमेकांच्या मानेस आखूड दोरीने बांधून निर्दयपणे मारहाण करत आणताना आढळले. त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांची नावे शेख आवेस शेख युनुस आणि प्रमोद चव्हाटे अशी असल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीत सदर बैल हे बोरगाव मंजू येथील रहीम कुरेशी व सज्जू उर्फ सज्जाद कुरेशी यांचे असून कत्तलीसाठी आणण्यास सांगितल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी चारही बैल ताब्यात घेतले. त्यांची अंदाजे एकूण किंमत १ लाख ६५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. बैलांना निर्दयतेने मारहाण करून एकमेकांना घट्ट बांधून कत्तलीसाठी नेत असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित १९९५) मधील कलम ५(अ)(ब), ९ तसेच प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध करणारा अधिनियम १९६० मधील कलम ११(ड) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी शेखर कोद्रे यांच्या फिर्यादीवरून शेख आवेस शेख युनुस, प्रमोद चव्हाटे, रहीम कुरेशी आणि सज्जू उर्फ सज्जाद कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांच्या नेतृत्वात , पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, ज्ञानेश्वर लांडे, पोलीस अंमलदार शेखर कोद्रे, अक्षय देशमुख , सैनिक रामहरी नागे यांनी केली

