Mahashivratri Special : शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हिरव्यागार वनराईने वेढलेल्या टेकड्यांच्या कुशीत वसलेले श्री पंचानन खोरेश्वर महादेव मंदिर हे भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान बनले आहे. नवसाला पावणारे महादेव अशी जनसामान्यांची भावना असून श्रावण महिन्यात येथे भक्तांची मोठी गर्दी उसळत असते.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हिरव्यागार वनराईने वेढलेल्या टेकड्यांच्या कुशीत वसलेले श्री पंचानन खोरेश्वर महादेव मंदिर हे भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान बनले आहे. नवसाला पावणारे महादेव अशी जनसामान्यांची भावना असून श्रावण महिन्यात येथे भक्तांची मोठी गर्दी उसळत असते.
या मंदिराबाबत प्रचलित अख्यायिकेनुसार परिसरातील एका शेतकऱ्याला नांगरताना महादेवांची पिंड सापडली. त्यानंतर स्वर्गीय जमनराव चव्हाण व मुंजेबा माळोदे यांनी ती पिंड खोऱ्यातील वटवृक्षाखाली स्थापून पूजा-अर्चा सुरू केली. परिसरातील दऱ्या-खोऱ्यांमुळे या देवस्थानाला ‘खोरेश्वर’ हे नामाभिधान प्राप्त झाले. घनदाट अरण्य, वटवृक्षांची दाटी आणि शहराच्या गजबजाटापासून दूर असलेले शांत वातावरण यामुळे भाविकांचा ओढा येथे कायम राहतो.
मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बांधकामादरम्यान अवघ्या दोन फुटांवर स्वच्छ पाण्याचा झरा लागला. त्या ठिकाणी दगडी बारव बांधण्यात आली असून स्पटिकासारखे निर्मळ पाणी भाविकांसाठी तीर्थरूप मानले जाते. श्रावण महिन्यात दररोज अभिषेक, अन्नदान तसेच वद्य सप्तमीला अखंड शिवनाम सप्ताह आयोजित केला जातो. १९८७ पासून सुरू असलेली ही परंपरा आजही अखंड सुरू आहे. पोळ्याच्या आदल्या दिवशी महाप्रसाद व रात्री त्रिकाल महापूजेचे आयोजन केले जाते.
पूर्वी लहान स्वरूपातील असलेल्या मंदिराला १९९२ नंतर भाविकांच्या सहकार्याने भव्य रूप प्राप्त झाले. मंदिराशेजारी श्रीराम भक्त बजरंगबली हनुमान मंदिर उभारण्यात आले असून भाविकांना एकाच ठिकाणी शिवशंकर व मारुतीरायाचे दर्शन घेता येते. दोन्ही मंदिरांसमोर दानशूर भक्तांच्या मदतीने भव्य सभामंडप व अन्नदानगृह उभारले गेले आहे.
दरम्यान, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था खालावल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहराचा विस्तार वाढल्यामुळे या मार्गावर वाहनांची व नागरिकांची वर्दळ वाढली आहे. प्रशासनाने रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व सुशोभीकरण केल्यास भाविकांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महसूल प्रशासन, नगर परिषद, सामाजिक वनीकरण विभाग, पंचायत समिती, लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था व नागरिकांच्या सहभागातून मंदिर परिसरातील टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यामुळे परिसर अधिक नयनरम्य होत असून सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. येत्या काही वर्षांत हा परिसर पर्यटनकेंद्र म्हणून विकसित होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पश्चिमेकडील शांत, निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे देवस्थान देऊळगाव राजा शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग ठरत आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे भाविकांची उपस्थिती अधिक वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

