Shri Chaitanya Shriji Masa : “आत्मकल्याणाचा विचार न करणारा मनुष्य हा स्वतःच्या आत्म्याचा गुन्हेगार ठरतो. आत्मा हा मनुष्याचा खरा आणि शेवटपर्यंत साथ देणारा सोबती आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आत्म्याशी मधुर आणि दृढ संबंध प्रस्थापित करावेत,” असे प्रतिपादन जैन साध्वी प.पू. श्री चैतन्यश्रीजी मासा यांनी केले.

मयूर गाेलेच्छा
लोणार : “आत्मकल्याणाचा विचार न करणारा मनुष्य हा स्वतःच्या आत्म्याचा गुन्हेगार ठरतो. आत्मा हा मनुष्याचा खरा आणि शेवटपर्यंत साथ देणारा सोबती आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आत्म्याशी मधुर आणि दृढ संबंध प्रस्थापित करावेत,” असे प्रतिपादन जैन साध्वी प.पू. श्री चैतन्यश्रीजी मासा यांनी केले.
स्थानिक गेलडा भवन येथे आयोजित प्रवचनमालेच्या तिसऱ्या दिवशी त्या बोलत होत्या. यावेळी मोठ्या संख्येने जैन समाजबांधव उपस्थित होते. आपल्या ओजस्वी व प्रभावी वाणीतून त्यांनी आत्मचिंतन, आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीचे महत्त्व पटवून दिले.
त्या म्हणाल्या, “ज्या संपत्तीच्या मागे आपण आयुष्यभर धावतो, ती संपत्ती घराच्या उंबरठ्यापर्यंतच साथ देते. नातेवाईक आणि मित्रपरिवार स्मशानभूमीपर्यंत सोबत येतात. शरीरही चितेपर्यंतच साथ देते; परंतु आत्मा हा जन्मोजन्मीचा सोबती आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आणि त्यानंतरही आत्माच आपल्या कर्मांचा साक्षीदार असतो. त्यामुळे बाह्य वैभवापेक्षा आत्मसमृद्धी अधिक महत्त्वाची आहे.”
सांसारिक मोह, लोभ आणि स्पर्धेमुळे मनुष्य आत्म्यापासून दूर जात असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी सांगितले की, आत्म्याशी नाते दृढ झाले तर जीवनातील दुःख, तणाव आणि अस्वस्थता आपोआप नाहीशी होते. “आत्म्याशी संवाद साधण्यासाठी साधना, स्वाध्याय, संयम आणि सदाचार आवश्यक आहेत. आत्मपरीक्षण केल्यास आपले दोष स्पष्ट दिसतात आणि त्यांचे परिमार्जन करण्याची प्रेरणा मिळते,” असे त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी अरिहंत प्रभूंच्या उपदेशांचा उल्लेख करत सांगितले की, “अरिहंत प्रभूंनीही आत्मसाक्षात्कारावर भर दिला आहे. आत्म्याशी नाते जोडले तर जीवनात कोणतेही दुःख शिल्लक राहत नाही. आत्मा शुद्ध, शांत आणि आनंदस्वरूप आहे. त्याची अनुभूती घेतली तर जीवन खऱ्या अर्थाने मंगलमय होते.” प्रवचनाच्या शेवटी उपस्थितांनी आत्मकल्याणासाठी नियमित साधना व सद्वर्तनाचे पालन करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक जैन समाजाच्या वतीने करण्यात आले होते.

