A burglary occurred : देऊळगाव मही येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत सुमारे २ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

बॅटरीच्या उजेडामुळे चोरीचा प्रयत्न उघडकीस, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
गजानन तिडके
देऊळगाव मही : देऊळगाव मही येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत सुमारे २ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी रघुनाथ माधव मुजमुळे (वय ४९, व्यवसाय शेती, रा. देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) यांनी देऊळगाव मही पोलीस चौकीत तोंडी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे पत्नी व मुलासह घरी वास्तव्यास असून शेती व्यवसाय करतात. फिर्यादीच्या माहितीनुसार, दि. ५ फेब्रुवारीच्या रात्री ते आपल्या बेडरूममध्ये झोपलेले होते, तर त्यांचा मुलगा पवन मुजमुळे हा हॉलमध्ये झोपलेला होता. रात्री सुमारे १.३० वाजता अचानक डोळ्यांवर बॅटरीचा उजेड पडल्याने फिर्यादी जागे झाले. त्यांनी उठून पाहिले असता घराच्या बाहेरील दरवाजाजवळ एक इसम उभा असल्याचे दिसले. त्यास ‘कोण आहे?’ असे विचारताच तो खाली पडून पळून गेला. या आवाजामुळे फिर्यादींचा मुलगा पवन झोपेतून उठला असता त्याच्या खोलीचा दरवाजा बाहेरून दोरीने बांधलेला असल्याचे आढळून आले. त्यानंतर मुलगा दुसऱ्या दरवाजाने बाहेर आला. तत्काळ फिर्यादींनी आपले पुतणे मल्हारी अण्णा मुजमुळे यांना फोन करून बोलावून घेतले. सर्वांनी घराची तपासणी केली असता घरातील कपाट उघडे असून ड्रॉवरमधील मौल्यवान दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
चोरट्यांनी कपाटातून सोन्याचे पशुमणी व पेंडल (२३ ग्रॅम, किंमत सुमारे १,१५,००० रुपये), सोन्याचा गोप (१३ ग्रॅम, ६५,००० रुपये), सोन्याची अंगठी (५ ग्रॅम, २५,००० रुपये), सोन्याचे झुंबर (९ ग्रॅम, ४५,००० रुपये) तसेच कारले मणी व डोरले (५ ग्रॅम, २५,००० रुपये) असा एकूण सुमारे २,७५,००० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध देऊळगाव मही पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

