student tragically died : पूर्णा ते अकोला ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेखाली आल्याने बारावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. ४ फेब्रुवारी रोजी पहाटे सायखेड शिवारात घडली. ज्ञानशील राजरत्न इंगळे (वय १७) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे.

पूर्णा–अकोला रेल्वे मार्गावरील सायखेड शिवारातील पहाटेची हृदयद्रावक घटना
बबन इंगळे
सायखेड (ता. बार्शीटाकळी) : पूर्णा ते अकोला ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेखाली आल्याने बारावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. ४ फेब्रुवारी रोजी पहाटे सायखेड शिवारात घडली. ज्ञानशील राजरत्न इंगळे (वय १७) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानशील हा रात्री वडिलांच्या मदतीसाठी सायखेड शिवारातील शेतात जागल करण्यासाठी गेला होता. पहाटे शेतातून घरी परतत असताना रेल्वे गाडी क्रमांक ०७६८४ (पूर्णा–अकोला डेमो रेल्वे) च्या इंजिनखाली तो आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती रेल्वे चालकाने तत्काळ रेल्वे प्रशासनाला दिल्यानंतर रेल्वे पोलीस उपनिरीक्षक संजय सुरवाडे, रेल्वे पोलीस कर्मचारी तसेच रात्रीच्या दस्तीवर असलेले बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे विलास नाफडे हे घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांना माहिती देऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृतक ज्ञानशील इंगळे हा धाबा येथील सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होता. अत्यंत मनमिळावू स्वभावाचा, मदतीस तत्पर व सामाजिक कार्यात सक्रिय असलेला ज्ञानशील सर्वांचा लाडका होता. त्याच्या आकस्मिक निधनाची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच शोककळा पसरली.
मृतकाच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे. सदर घटना अपघात आहे की आत्महत्या, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय धनराज राऊत करीत आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

