Mahabreaking

[breaking_news]

Guardian Minister Phundkar : अद्ययावत तंत्रज्ञानातून लोकाभिमुख सेवा देण्यावर भर : पालकमंत्री फुंडकर

Guardian Minister Phundkar : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करतानाच, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले.

Guardian Minister Phundkar

अकोल्यात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अकोला : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करतानाच, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले.

भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त लालबहादुर शास्त्री क्रीडांगण येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, पथसंचलन, कवायती व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची नवी उंची गाठत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान नेतृत्वामुळे महाराष्ट्र विकासाच्या आघाडीवर अग्रस्थानी आहे. नागरिकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब शासकीय निर्णयप्रक्रियेत दिसावे, यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या गरजा ओळखून तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी जिल्हा डॅशबोर्ड, जिल्हा वॉररूम, व्हॉट्सॲप चॅटबॉट यांसारख्या अद्ययावत प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी, कामगार, महिला व विविध समाजघटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या ३ लाख ३१ हजार ९९४ शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे २६० कोटी ३९ लाख २६ हजार रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. खरीप हंगामात १ हजार ७० कोटी रुपये, तर रब्बी हंगामात ७९ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरण झाले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगामात २ लाख २२ हजार ८४ शेतकरी सहभागी झाले असून १ लाख ८४ हजार १९१ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे.

कृषी यांत्रिकीकरण, मनरेगा, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, पीएम सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना तसेच राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजनेच्या अंमलबजावणीची माहितीही त्यांनी दिली.

आरोग्य विभागातर्फे आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना व राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम प्रभावीपणे राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवापूर, पातूर, बोरगाव मंजूर व अकोट येथील रुग्णालयांची कामे लवकरच पूर्ण होतील, असेही त्यांनी सांगितले.

अकोला जिल्हा पोलीस दलामार्फत ‘प्रोजेक्ट त्रिनेत्र’ हा एआय आधारित उपक्रम राबविण्यात येत असून, ‘बॉडी क्राईम’ प्रकारातील गुन्ह्यांमध्ये ६४ टक्के घट झाली आहे. ‘प्रोजेक्ट रक्षा’ नागरिक प्रतिसाद प्रणालीद्वारे जिल्ह्याचा नागरिक विश्वास निर्देशांक १० पैकी ८.९ इतका उत्कृष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवीन कामगार संहितांच्या अंमलबजावणीबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, कामगारांचे हित, सामाजिक सुरक्षा व सर्वसमावेशक विकास लक्षात घेऊन निर्णय घेतले जातील. अकोला येथील नियोजित कामगार भवनासाठी १६ कोटी ६१ लाख ९२० रुपयांचा निधी मंजूर झाला असून सर्व कामगार कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत.

जिल्ह्यात ४ लाख ५५ हजार ३२ कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी झाली असून विविध कल्याणकारी योजनांतून हजारो कामगारांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

जलजीवन मिशन अंतर्गत १५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आली असून ५२३ गावांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच नरनाळा किल्ल्यावर ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या नरनाळा महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी पालकमंत्र्यांनी विशेष वाहनातून पथकांचे निरीक्षण केले. परेड कमांडर म्हणून आयपीएस अधिकारी ईशानी आनंद यांनी जबाबदारी पार पाडली. विविध पथकांचे पथसंचलन व विद्यार्थ्यांच्या कवायतींनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top