Waki Budruk school : जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमात देऊळगाव राजा तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, वाकी बुद्रुक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर दि. १५ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती देऊळगाव राजा येथील गटविकास अधिकारी मुकेश माहोर यांनी शाळेस सदिच्छा भेट दिली.

‘शिक्षणामुळेच नेतृत्व घडते’ – गटविकास अधिकारी मुकेश माहोर
गजानन भालेकर
धोत्रा नंदाई : जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमात देऊळगाव राजा तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, वाकी बुद्रुक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर दि. १५ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती देऊळगाव राजा येथील गटविकास अधिकारी मुकेश माहोर यांनी शाळेस सदिच्छा भेट दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व आनंददायी पद्धतीने अधिकाऱ्यांचे स्वागत केले. शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. भेटीदरम्यान शाळेतील स्वच्छ व सुंदर वातावरण, शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, भौतिक सुविधा तसेच परसबाग पाहून गटविकास अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांशी थेट संवाद
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गटविकास अधिकारी मुकेश माहोर यांनी शिक्षणाचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले.
“जीवनात मोठे व्हायचे असेल तर शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणामुळेच सामान्य व्यक्तीही मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकते,” असे सांगत त्यांनी गावातील अनुसूचित जमातीतील सरपंचांचे उदाहरण दिले. शिक्षणामुळेच ते आज नेतृत्वाच्या भूमिकेत असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास करून उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच गावातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांकडे वळावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरराव चेके, गावचे सरपंच पवणेर भोसले, गजानन चेके, सुनील भाऊ बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीबाबत अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात सक्रिय सहभागाबद्दल शिक्षकवृंदाचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव मुरकुट यांनी केले. प्रास्ताविक व मार्गदर्शनपर भाषण मुख्याध्यापिका विद्या ढवळे-गायकवाड यांनी केले. शाळेतील परसबागेबाबत माहिती राठोड सर यांनी दिली, तर आभार प्रदर्शन गणेश घुगे यांनी केले.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी नवचैतन्य निर्माण झाले असून ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीस निश्चितच बळ मिळाले आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

