Zilla Parishad schools : कारेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या गेल्या दोन ते तीन वर्षांपासून केवळ शोभेपुरत्याच उभ्या आहेत. मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या उभारण्यात आल्या असल्या तरी त्या अद्याप वापरात आलेल्या नाहीत.

कारेगाव : कारेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या गेल्या दोन ते तीन वर्षांपासून केवळ शोभेपुरत्याच उभ्या आहेत. मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या उभारण्यात आल्या असल्या तरी त्या अद्याप वापरात आलेल्या नाहीत.
शाळेमध्ये जुनी पाण्याची टाकी गळतीमुळे वापरात नव्हती. त्यामुळे नवीन टाकी उभारण्यात आली होती. मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे ही टाकीही आजपर्यंत कार्यान्वित झालेली नाही. टाकीला नळसुद्धा बसवलेला नाही. इंजिनिअरांनी पाहणी करून अहवाल पंचायत समितीकडे सादर केला होता. या टाकीची एम.बी.-सी.सी. देखील करण्यात आली होती. तरीही टाकी वापरात आली नाही. याकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न शाळा समिती व ग्रामस्थांमध्ये उपस्थित होत आहे.
शाळा समितीने वारंवार हा विषय ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि ठेकेदार यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. तरीदेखील काम पूर्ण होऊनही टाकी वापरात का आणली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जुन्या टाकीची स्थिती निष्कृष्ट झाल्यामुळे ती कोसळून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही टाकी पाडण्यासाठी शाळेने ग्रामपंचायतीकडे पत्र दिलेले असूनसुद्धा ती अद्याप पाडण्यात आलेली नाही.
नवीन टाकीच्या खाली भरपूर मोकळी जागा असल्याने पाणी झिरपल्यामुळे तिथे साप-विंचू निर्माण होण्याचा धोका आहे. तरीदेखील ग्रामपंचायत आणि पंचायत समिती जाणीवपूर्वक या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
शाळेमध्ये पाण्याची टाकी असली तरी त्यात पाणी साठवले जात नसल्याने विद्यार्थी पाणी आणण्यासाठी शाळा सोडून बाहेर जातात. त्यामुळे काही विद्यार्थी वर्गाबाहेर भटकताना दिसतात.
“नवीन टाकी पाण्याने भरली तरी लगेच रिकामी होते. ही बाब पंचायत समिती बी.डी.ओ. साहेब यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तरी या विषयाकडे विशेष लक्ष देऊन शाळेतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा,” अशी मागणी शाळा समितीने केली आहे.
भागवतराव चव्हाण, अध्यक्ष, शाळा समिती

