The water level of Lonar Lak: तालुक्यात गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या जाेरदार पावसामुळे जगप्रसिद्ध लाेणार सराेवराची पाणीपातळीही वाढली आहे. त्यामुळे, सराेवर परिसरात असलेल्या प्राचीन व प्रसिद्ध कमळजा मातेच्या मंदिरात पाणी शिरले आहे. थेट मंदिराच्या गाभाऱ्यात पाण्याचा शिरकाव झाला आहे.त्यामुळे, ऐन नवरात्राेत्सवात भाविकांना दर्शनापासून वंचित रहावे लागत आहे.

नवरात्राेत्सवात भाविकांची दर्शनासाठी असते गर्दी, मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पाेहचले पाणी
लोणार : तालुक्यात गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या जाेरदार पावसामुळे जगप्रसिद्ध लाेणार सराेवराची पाणीपातळीही वाढली आहे. त्यामुळे, सराेवर परिसरात असलेल्या प्राचीन व प्रसिद्ध कमळजा मातेच्या मंदिरात पाणी शिरले आहे. थेट मंदिराच्या गाभाऱ्यात पाण्याचा शिरकाव झाला आहे.त्यामुळे, ऐन नवरात्राेत्सवात भाविकांना दर्शनापासून वंचित रहावे लागत आहे.
स्थानिक ग्रामस्थ व भाविकांच्या म्हणण्यानुसार, मंदिर परिसरातील सुमारे ४० टक्के भाग पाण्याखाली गेला आहे. सरोवरापासून साधारण १० फूट उंचीवर व ४०० मीटर अंतरावर असलेले हे मंदिर पाऊस अशीच अविरत कोसळत राहिला, तर पूर्णपणे पाण्यात बुडण्याची भीती निर्माण झाली आहे.दरवर्षी नवरात्रोत्सव काळात पंचक्रोशीतील हजारो भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी येथे दाखल होतात. मात्र, यावर्षी विक्रमी पावसामुळे भाविकांसाठी जाणारे सर्व पारंपरिक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. ग्रामस्थ व प्रशासनाने पर्यायी मार्ग निर्माण केला असला, तरी सतत वाढणारी पाणीपातळी व दमदार पावसामुळे तो मार्गही धोकादायक ठरत आहे.
केवळ कमळजा माता मंदिरच नव्हे, तर मोर महादेव, वाघ महादेव, बगीचा महादेव यांसह परिसरातील अनेक मंदिरे सरोवराच्या पाण्यात बुडाली आहेत. त्यामुळे धार्मिक वातावरणात हुरहूर निर्माण झाली आहे. स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या मते, गेल्या अनेक दशकांच्या नोंदीनुसार एवढी जलपातळी यापूर्वी कधीही वाढलेली नाही.
दरम्यान, पाण्याच्या प्रवाहामुळे मंदिर परिसर पाण्याखाली गेला असून सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे अनेक भाविकांनी दर्शनाचा विचार सोडून परत फिरणे पसंत केले, तर काही जण धोक्याची पर्वा न करता पर्यायी मार्गाने मंदिर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले असून, वाढत्या पाण्यामुळे धार्मिक स्थळे व भाविकांची सुरक्षा ही मोठी चिंता ठरत आहे. पाऊस याच वेगाने सुरू राहिला, तर पुढील काही दिवसांत मंदिर व परिसर पूर्णपणे सरोवराच्या पाण्यात बुडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाविकांसाठी ही परिस्थिती हृदय पिळवटून टाकणारी ठरत असून, शक्तीपीठाच्या ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वामुळे नवरात्रात असे संकट प्रथमच उद्भवल्याचे दिसून येते. दरम्यान, पाऊस थांबून पुन्हा देवीचे दर्शन सुकर व्हावे, यासाठी भाविक प्रार्थना करत आहेत.

