rural hospital building : साखरखेर्डा येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. तत्कालीन आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी ही मागणी पूर्ण केली असून रुग्णालयाची सुसज्ज इमारत पूर्ण झाली; मात्र अनेक वर्षे त्याचे उद्घाटन प्रलंबित आहे. माजी आमदार खेडेकर यांनी पुढाकार घेत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि त्यांच्या पथकाने आज ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली.

माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांचा पुढाकार; जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पथकाने केली पाहणी
साखरखेर्डा : साखरखेर्डा येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. तत्कालीन आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी ही मागणी पूर्ण केली असून रुग्णालयाची सुसज्ज इमारत पूर्ण झाली; मात्र अनेक वर्षे त्याचे उद्घाटन प्रलंबित आहे. माजी आमदार खेडेकर यांनी पुढाकार घेत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि त्यांच्या पथकाने आज ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली.
साखरखेर्डा येथील लोकसंख्या २५ हजार असून परिसरातील सुमारे ३५ गावे या केंद्राशी संबंधित आहेत. सध्या येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून दररोजची ओपीडी ३०० ते ३५० दरम्यान असते. आरोग्य अधिकाऱ्यांची कमतरता, अपुरा कर्मचारी वर्ग आणि वाढती गर्दी यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
स्थानिक माजी सरपंच तथा शिवसेना नेते रविंद्र पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यावेळी शिवसेना-भाजपा सरकार असूनही मंजुरी लांबली. त्यानंतर आरोग्य मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या काळात पुन्हा पत्रकारांनी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर ग्रामीण रुग्णालयास मंजुरी मिळाली. मात्र निधीअभावी कामाला ब्रेक लागला.
२०१४ मध्ये आमदार डॉ. खेडेकर यांनी तत्कालीन आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून १४ कोटी ९५ लाख रुपये मंजूर करून घेतले. रुग्णालय तसेच कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामासाठी ३ कोटी ८० लाख मंजूर करण्यात आले. दोन्ही इमारती पूर्ण होऊन चार वर्षे उलटली तरी रुग्णालय सुरू झाले नव्हते. नागरिकांनी हा विषय पुन्हा माजी आमदार खेडेकर यांच्याकडे मांडला. त्यांनी तत्काळ दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाग्यश्री श्रीनिवास खेडेकर यांनी हा प्रस्ताव मांडला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाहीचे आश्वासन दिले.
८ डिसेंबर रोजी माजी आमदार डॉ. खेडेकर यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन ग्रामीण रुग्णालयासंबंधी सविस्तर माहिती दिली. रुग्णालय सुरू करण्यासाठी मनुष्यबळ भरती, अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करणे आदी आवश्यक गोष्टींची मागणी त्यांनी केली. येथे सोनोग्राफी, प्रसूती तसेच बालरोग सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना चिखली किंवा बुलडाणा गाठावी लागते. रात्रीच्या वेळी वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनतो. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालय किती अत्यावश्यक आहे यावर त्यांनी भर दिला.
आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या आदेशानुसार आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बिराजदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता जे. एन. काळे, विज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता मंगेश पागोरे, शाखा अभियंता संतोष आढावा यांनी रुग्णालयाची तपशीलवार पाहणी केली. पाहणी अहवाल आरोग्य मंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे.
संपूर्ण प्रकल्पाची माहिती पलसिद्ध कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक अर्जुन काटे यांनी दिली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबूराव मोरे, युवासेना तालुका प्रमुख संदीप मगर, बाजार समिती संचालक दिलीप बेंडमाळी, ग्रामपंचायत सदस्य संदीप खिल्लारे, चरणसिंग राजपूत, गोपाल राजपूत व संतोष राजपूत उपस्थित होते.

