Cotton stalks and soybean soil : यंदा पावसाने खरिपाच्या सर्व पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. कपाशीवर बोंडअळी व बोंडसळ असल्याने बोंड सडले व गळ होत आहे. दरवर्षी दसऱ्याला कापसाची सीतादही व्हायची यंदा मात्र तशी स्थिती नाही, फुटलेला कापूस ओला होत आहे. त्यातच कापणीच्या हंगामात पावसाने सोयाबीन पिवळे पडून जागेवरच सडत असल्याने हातच्या पिकाची माती होत आहे.

तूर कपाशी, सोयाबीन बाधित, ऐन खरिप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
बाळापूर : यंदा पावसाने खरिपाच्या सर्व पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. कपाशीवर बोंडअळी व बोंडसळ असल्याने बोंड सडले व गळ होत आहे. दरवर्षी दसऱ्याला कापसाची सीतादही व्हायची यंदा मात्र तशी स्थिती नाही, फुटलेला कापूस ओला होत आहे. त्यातच कापणीच्या हंगामात पावसाने सोयाबीन पिवळे पडून जागेवरच सडत असल्याने हातच्या पिकाची माती होत आहे.
सततचा पाऊस, ढगाळ वातावरण व जमिनीत वाढलेल्या आर्द्रतेमुळे पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा होत नसल्याने पिके पिवळी पडली. शिवाय बुरशीजन्य रोगाचा अटॅक झालेला आहे. सोयाबीन पिवळे पडले असून, शेंगात दाणे न भरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कपाशीवर आता बोंडअळी अन् बोंडसळचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. काही भागात कपाशी पिवळी पडली आहे. शिवाय पातेगळ होत असल्याने सरासरी उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे.
तालुक्यात खरिपाचे किमान ४८ हजार १६१ शेतकरी खातेदार आहेत. त्या तुलनेत २५ हजाराचे वर शेतकऱ्यांचे पिकांचे सततचा पाऊस व अतिवृष्टीने नुकसान झालेले आहे. शिवाय पीक पिवळे पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने खरिपाचा हंगामच धोक्यात आला आहे.
आर्द्रतेचा फटका, तुरीवर मर
जमिनीत ओलाव्याचे प्रमाण जास्त असताना ढगाळ वातावरण व सूर्यप्रकाशाचा अभाव त्यामुळे तुरीवर बुरशीजन्य रोगाचा अटॅक ” झालेला आहे. त्यामुळे तुरीवर ‘आकस्मिक मर’ रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. चांगल्या प्रतवारीच्या जमिनीत तूर जागेवरच सुकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरासरी उत्पादनात कमी येण्याची शक्यता आहे.
दसऱ्याला सीतादही नाहीच
दरवर्षी नवरात्र व दसऱ्याला जिनिंगमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ होतो. यंदा मात्र दोन महिन्यांपासून ढगाळ वातावरण व सततचा पाऊस कापसाचा हंगाम लांबणीवर पडला. प्रतिकूल वातावरणात कपाशीवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. ‘सीसीआय’द्वारा १५ ऑक्टोबरपासून कापसाची हमीभावाने खरेदी सुरू होईल. मात्र, केंद्रांवर कापूस येणार कुठून, हा प्रश्न आहे.
पावसाने सोयाबीन सडले, तुरीवर मर आलेला आहे. कपाशी पिवळी पडली, पात्या बोंडांची गळ झालेली आहे. विम्याचे निकष यावर्षी बदलले. त्यामुळे यंदा उत्पादन खर्च पदरी पडण्याची शक्यता नाही.
अजय वानखडे – शेतकरी बाळापूर

