Mahabreaking

[breaking_news]

Anganwadi workers : प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बुधवारी धडक मोर्चा

Anganwadi workers : बालवयात जीवनाचा परिपाठ घडविणाऱ्या अंगणवाडी ताई तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि न्यायहक्कांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर येत्या बुधवारी मोर्चा धडकणार आहे. या मोर्चामध्ये जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Anganwadi workers

 नागपूर येथील अधिवेशनावर देणार धडक ; सहभागी होण्याचे आवाहन

देऊळगाव राजा : बालवयात जीवनाचा परिपाठ घडविणाऱ्या अंगणवाडी ताई तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि न्यायहक्कांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर येत्या बुधवारी मोर्चा धडकणार आहे. या मोर्चामध्ये जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाचा मूळ पाया मानल्या जाणाऱ्या अंगणवाडी केंद्रांमधूनच शासनाच्या विविध योजना राबविल्या जातात. अल्प मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनाने मंजूर करूनही अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे आपल्या न्यायहक्कासाठी त्यांना लढा द्यावा लागत आहे.

शासनाने 25 जानेवारी 2024 रोजी अंगणवाडी सेविकांसाठी 15 हजार रुपये, तर मदतनीसांसाठी 8,500 रुपये मानधन जाहीर केले होते. यात प्रोत्साहन भत्त्याचा उल्लेख नव्हता. तथापि, शासनाने त्यात बदल करून सेविकांना दोन हजार रुपये आणि मदतनीसांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश काढले. मात्र दिलेल्या आश्वासनाऐवजी केवळ एकदाच प्रोत्साहन भत्ता देऊन या मुद्द्याला बगल देण्यात आल्याचा आरोप आहे.

दुसऱ्या प्रमुख मागणीत, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याचे काम अंगणवाडी कर्मचारी करत असूनही त्यांना अद्याप शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात आलेला नाही.अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी देणे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी ॲक्ट अंतर्गत ते पात्र असल्याने त्याबाबत तातडीने शासन आदेश काढणे, दरमहा पेन्शन देणे यांसह अनेक मागण्या प्रलंबित आहेत.

अंगणवाडी सेविकांमधून पर्यवेक्षक पदांची 50 टक्के आरक्षित भरती करावी आणि रिक्त पदे त्वरीत भरावीत, अशीही महत्त्वाची मागणी आहे.तसेच पंतप्रधान मातृत्व वंदना योजना ही आरोग्य विभागाची असून ती महिला व बाल विकास विभागावर टाकण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

ऑनलाइन कामांसाठी तालुकास्तरीय अधिकारी दबाव तंत्राचा वापर करत असल्याने सेविकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे काही जिल्ह्यांत आत्महत्येसारखे प्रकार घडल्याची नोंद आहे, याची दखल शासनाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

एफआरएस चेहरा ओळख प्रणाली तात्काळ रद्द करावी, कारण टीएचआर वितरणासाठीही या प्रणालीचा अनावश्यक वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले. शिवाय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असल्याने पोषण ट्रॅकर अॅप नीट काम करत नाही, अशी तक्रारही मांडण्यात आली.

या सर्व मागण्यांसाठी दिनांक 10 डिसेंबर रोजी बुधवारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि कर्मचाऱ्यांचा मोर्चा धडकणार असून मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याचे आयटक संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.

या मोर्चासाठी जिल्ह्यातून तसेच तालुक्यातून जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर गायकवाड, जिल्हा सचिव सुरेखा तळेकर, देऊळगाव राजा तालुका अध्यक्षा सुनिता तिडके आणि तालुका सचिव रेणुका डोईफोडे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top