A young man was killed : मित्रांमधील वाद सोडवणे एका युवकाच्या जीवावर बेतले. कारंजा रमजानपूर फाट्यावर बावीस वर्षीय युवकावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. ही घटना १डिसेंबर रोजी घडली. विशेष म्हणजे, पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात आरोपीला जेरबंद केल्याची माहिती मिळाली आहे.

कारंजा रमजानपूर फाट्यावरील घटना : उरळ पोलिसांनी अर्ध्या तासात केली आरोपींना अटक
राहुल सोनोने
वाडेगाव : मित्रांमधील वाद सोडवणे एका युवकाच्या जीवावर बेतले. कारंजा रमजानपूर फाट्यावर बावीस वर्षीय युवकावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. ही घटना १डिसेंबर रोजी घडली. विशेष म्हणजे, पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात आरोपीला जेरबंद केल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीने उरळ पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादीचा चुलत भाऊ गौरव गणेश बावस्कर (२२) हा मित्र मंगेश नागोलकर याच्यासोबत शेतातील काम आटोपून घरी येत असताना कारंजा रमजानपूर फाट्यावर पोहोचला. तेव्हा त्यांना राम नागोलकर, कृष्णा जीनकर, प्रणव इंगळे, प्रेम मोरे, विजय मोरे व संतोष मोरे हे आपसात भांडत असल्याचे दिसले.
फिर्यादी व गौरव यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, अचानक विजय मोरे, संतोष मोरे व प्रेम मोरे (राहणार लोहारा) यांनी राम नागोलकर याला मारहाण सुरू केली. यावेळी विजय मोरे व संतोष मोरे यांनी त्यांच्या कमरेतून धारदार शस्त्र काढले. त्यानंतर विजय मोरे यांनी गौरव बावस्करच्या छातीवर चाकूने वार केला, तसेच पुन्हा चाकू बाहेर काढून त्याच्या पोटातही वार केले. प्रेम मोरे गौरवला मारहाण करत होता.
या वारांमुळे गौरव बावस्कर गंभीररित्या जखमी होऊन जागेवरच मरण पावला. याच दरम्यान राम नागोलकर याच्यावरही चाकूने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तो वार चुकवून तेथून पळून गेला.
गौरवला ठार करणारे विजय मोरे, संतोष मोरे आणि प्रेम मोरे हे घटनास्थळावरून पसार झाले, असे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी व उपविभागीय अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार एपीआय पंकज कांबळे, पोलीस उपनिरीक्षक कायंदे, पोलीस उपनिरीक्षक अरुण मुंडे व पथकाने तात्काळ तपास सुरू करून आरोपीस अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

