Attempted theft: तालुक्यातील शेंदला (नायगाव द.) येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत दोन अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री खिडकी फोडून बँकेत प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री २ वाजता घडली असून दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रकरणाची नोंद करण्यात आली.

खिडकी तोडून बँकेत केला प्रवेश ; रोख रक्कम सुरक्षीत, सिक्युरीटी अलार्म, कॅमेऱ्याचे केले नुकसान
मेहकर : तालुक्यातील शेंदला (नायगाव द.) येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत दोन अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री खिडकी फोडून बँकेत प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री २ वाजता घडली असून दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रकरणाची नोंद करण्यात आली.
फिर्यादी सोनल विजय खैरे (वय ३३), बँक मॅनेजर, भारतीय स्टेट बँक शेंदला (नायगाव द.) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.२० वाजता बँकेचे कर्मचारी रवि शेळके यांनी फोन करून “बँकेचा सिक्युरिटी अलार्म सुरू होत नाही आणि खिडकी तुटलेली दिसते,” असे कळविले.
फिर्यादी खैरे यांनी तत्काळ बँकेत येऊन पाहणी केली असता स्ट्राँग रूममधील लॉकरमधील रोकड व दागदागिने सुरक्षित असल्याचे आढळले. सर्व कागदपत्रे आणि महत्त्वाचे रेकॉर्डही सुरक्षित होते. मात्र सिक्युरिटी अलार्म सिस्टम पूर्णपणे डॅमेज करण्यात आलेली होती. कॅश काउंटरच्या मागच्या बाजूचा कॅमेरा फोडण्यात आलेला आढळला.
सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दि. २२ नोव्हेंबर रोजी रात्री २ वाजता दोन अज्ञात इसम खिडकी फोडून आत प्रवेश करताना व चोरीचा प्रयत्न करताना स्पष्ट दिसून आले. त्यांनी बँकेतील कोणतीही रोकड किंवा ऐवज चोरू शकला नाही; मात्र सुरक्षा यंत्रणा नुकसान करून चोरीचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले.
फिर्यादीच्या तोंडी अहवालावरून शेंदला (नायगाव द.) येथील भारतीय स्टेट बँकेत चोरीचा प्रयत्न व नुकसानप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, जानेफळचे ठाणेदार सपोनि अजिनाथ मोरे यांनी भेट दिली. पोलिसांनी सीसीटीव्हीतील चित्रफिती तपासून दोन अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला असून पुढील तपास मोहन सावंत यांच्याकडे देण्यात आला आहे.

