No road for 70 years: बाळापूर तालुक्यातील निंबी येथील ग्रामस्थांनी गेल्या 70 वर्षांपासून पक्का रस्ता न झाल्याच्या निषेधार्थ आगामी सर्व निवडणुकांवर सामूहिक बहिष्कार जाहीर केला आहे. याबाबतची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर केली आहे.

राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील निंबी येथील ग्रामस्थांनी गेल्या 70 वर्षांपासून पक्का रस्ता न झाल्याच्या निषेधार्थ आगामी सर्व निवडणुकांवर सामूहिक बहिष्कार जाहीर केला आहे. याबाबतची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर केली आहे.
निंबी येथील ग्रामस्थांनी एकमताने घेतलेल्या निर्णयात नमूद केले आहे की, गावाला जोडणारा अडीच किलोमीटरचा कच्चा रस्ता — निंबी ते निंबी फाटा — हा अकोला–जळगाव जामोद–मुक्ताईनगर मार्गाशी जोडलेला असून, स्वातंत्र्यानंतर कधीही हा रस्ता पूर्णपणे डांबरीकरण करण्यात आलेला नाही.
कधी अर्धा तर कधी एक किलोमीटर असे अपूर्ण काम करून गावकऱ्यांची बोळवण करण्यात आली, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
जिल्हा परिषद कार्यालयात चौकशी केली असता हा रस्ता त्यांच्या अखत्यारीत असल्याचे समजले, मात्र डागडुजीसुद्धा वेळेवर न झाल्यामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत गेली. विविध पातळ्यांवर पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने निंबीकरांनी बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या या रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झाले असून, शेतकरी शेतीमाल बाजारात नेऊ शकत नाहीत, तसेच विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. पावसाळ्यात तर सतत एक महिना विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही, अशी स्थिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, ही परिस्थिती एखाद्या अतिदुर्गम आदिवासी भागासारखी असून, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि उदासीनता यालाच जबाबदार धरताना त्यांनी म्हटले आहे—
“पक्का रस्ता मिळेपर्यंत गावातील एकही मतदार मतदान करणार नाही.”
निंबी ग्रामस्थांचा हा निर्णय प्रशासनाला धक्का देणारा असून, आगामी काळात या प्रकरणात काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

