12th exam center in Bibi : वसंतराव नाईक विद्यालय, बीबी येथे बारावीचे परीक्षा केंद्र मंजूर करावे, अशी मागणी ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर करत आहेत. विद्यालयात सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असूनही विद्यार्थ्यांना सुमारे 15 ते 20 किलोमीटर दूरच्या केंद्रावर परीक्षा द्यावी लागत आहे. विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

रमेश खंडागळे
बीबी : वसंतराव नाईक विद्यालय, बीबी येथे बारावीचे परीक्षा केंद्र मंजूर करावे, अशी मागणी ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर करत आहेत. विद्यालयात सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असूनही विद्यार्थ्यांना सुमारे 15 ते 20 किलोमीटर दूरच्या केंद्रावर परीक्षा द्यावी लागत आहे. विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
बीबी हे गाव राज्य महामार्गालगत असल्याने परिसरातील अनेक खेड्यांमधील विद्यार्थी शिक्षणासाठी वसंतराव नाईक विद्यालयात येतात. यंदा एकूण 353 विद्यार्थी—यात 203 मुली आणि 150 मुले—बारावीची परीक्षा देणार आहेत. ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतुकीची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांना दूरच्या केंद्रावर जाणे कठीण होत आहे. अनेक पालकांकडे वाहतुकीची साधने नसल्यामुळे मुलींना सकाळी लवकर निघावे लागते, यामुळे पालकांमध्ये चिंता वाढली आहे.
वसंतराव नाईक विद्यालय हे परिसरातील सर्वात जुने आणि मोठे शैक्षणिक केंद्र आहे. शाळेतील सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही, शाळेला वेढणारी संरक्षण भिंत, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच इतर सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय शाळेसमोरच पोलीस स्टेशन असल्याने मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे ठिकाण अत्यंत सुरक्षित मानले जाते.
बोर्ड परीक्षेसाठी आवश्यक सर्व नियम व सुविधा येथे उपलब्ध असल्याने बीबी येथेच परीक्षा केंद्र देण्यात यावे, अशी पालकांची आग्रही मागणी आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा परिसरातील पालकांनी व्यक्त केली आहे.
“आमच्या मुलींना 15 ते 20 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. प्रवासातील थकवा आणि परीक्षा ताणामुळे विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो. तसेच सुरक्षिततेची भीती कायम असल्याने पालकांनाही त्यांच्या सोबत जावे लागते. शेतकरी आणि गोरगरिब पालकांसाठी ही आर्थिकदृष्ट्या मोठी अडचण आहे. त्यामुळे बीबी येथेच परीक्षा केंद्र मंजूर करण्यात यावे.”
जानू चव्हाण (पालक)

