MLA Manoj Kayande: पश्चिम विदर्भातील ‘प्रति तिरुपती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री बालाजी महाराजांच्या पवित्र स्थानामुळे देऊळगाव राजा शहराची ओळख राज्यभर नाही तर देशभर पसरली आहे. मोठ्या प्रमाणात भाविक येणाऱ्या या शहरात विकासाचे अनेक प्रलंबित मुद्दे आहेत. आगामी नगरपरिषद निवडणुकीत हेच मुद्दे केंद्रस्थानी ठेवून अधिकृत उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन आमदार मनोज कायंदे यांनी २१ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केले.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : पश्चिम विदर्भातील ‘प्रति तिरुपती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री बालाजी महाराजांच्या पवित्र स्थानामुळे देऊळगाव राजा शहराची ओळख राज्यभर नाही तर देशभर पसरली आहे. मोठ्या प्रमाणात भाविक येणाऱ्या या शहरात विकासाचे अनेक प्रलंबित मुद्दे आहेत. आगामी नगरपरिषद निवडणुकीत हेच मुद्दे केंद्रस्थानी ठेवून अधिकृत उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन आमदार मनोज कायंदे यांनी २१ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
विकासाच्या व्हिजनलाच प्राधान्य — कायंदे
“निवडणूक कोणतीही असो; व्हिजन मांडणे सोपे, पण अंमलबजावणी कठीण. आमचा प्रचार ‘आम्ही काय नवीन देऊ शकतो’ यावर आधारित आहे,” असे सांगत आमदार कायंदे म्हणाले की,“पोकळ आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल होणार नाही, याची प्रभागातील प्रत्येक उमेदवारांनी काळजी घ्यावी.”
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना कायंदे यांनी दोन माजी आमदार एकत्र आल्याच्या चर्चेवरही प्रतिक्रिया दिली.
“अनैसर्गिक युतींना आम्ही महत्त्व देत नाही. आमचे ध्येय केवळ विकास. जनता आम्हाला कामासाठी ओळखते,” असे ते म्हणाले.
नगरपालिकेत सत्ता आवश्यक; विकासासाठी ठोस योजना जाहीर
कायंदे यांनी शहरातील महत्त्वाच्या प्रलंबित कामांचा उल्लेख करत सांगितले की, नवीन स्मशानभूमी पाणीपुरवठा योजना, सुलभ शौचालयांची उभारणी, ग्रीन झोनमधील भूखंडांचा विकास, शहरासाठी संस्थात्मक सुविधा वाढवणे ही सर्व कामे जाहीरनाम्यात समाविष्ट करून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिकेत सत्ता असणे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले.
खालच्या पातळीचा प्रचार टाळा — कार्यकर्त्यांना इशारा
“निवडणूक धकाधकीची असली तरी प्रचार खालच्या स्तरावर नको. विकासाच्या मुद्द्यांवरच लढा,” असे स्पष्ट निर्देश आमदार कायंदे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.
महायुतीचा उमेदवार: माधुरी शिंपणे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप व मित्रपक्षांनी संयुक्तरीत्या नगराध्यक्ष पदासाठी माधुरी शिंपणे यांना उमेदवारी दिली आहे. काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची परिस्थिती असून, “वाद नको, समन्वय हवा,” असे आवाहनही कायंदे यांनी केले. पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माधुरी शिंपणे, सर्व प्रभागातील उमेदवार, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश मांटे, सिद्दीक शेख, भगवान मुंडे, शंकर तलबे, संजय तिडके,निशिकांत भावसार, सुभाष दराडे, सदाशिव मुंडे, सुनील शेजुळकर, राजेश भुतडा, गजानन काकड, गणेश डोईफोडे तसेच राष्ट्रवादी (अजित पवार गट), भाजपा व मित्र पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

