Partially burnt body : बाळापूर–वाडेगाव मार्गावरील धनेगाव शेतशिवारात सुमारे 23 वर्षीय युवतीचा मृतदेह विवस्त्र आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत 20 नोव्हेंबर रोजी दुपारी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विवस्त्र अवस्थेत मृतदेह असल्याने खळबळ; ठसा तज्ञ व श्वान पथकाचा शोध सुरू
राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर–वाडेगाव मार्गावरील धनेगाव शेतशिवारात सुमारे 23 वर्षीय युवतीचा मृतदेह विवस्त्र आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत 20 नोव्हेंबर रोजी दुपारी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, धनेगाव येथील शेतकरी प्रमोद लांडे यांच्या मुख्य रस्त्यालगतच्या शेतात दुपारच्या सुमारास शेतमजूर गेले असता तुरीच्या पिकात एका युवतीचा जळालेला, विवस्त्र मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था पाहून आसपासच्या परिसरात लगेचच मोठी गर्दी जमा झाली. माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे, पोलीस उपनिरीक्षक संभाजी हिवाळे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनीही घटनास्थळी भेट देत सविस्तर पाहणी केली. दरम्यान, अकोला येथून ठसा तज्ज्ञ पथक तसेच श्वान पथक पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा प्रक्रिया पूर्ण केली असून, श्वान पथकाने घटनास्थळ परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.या प्रकरणातील युवतीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, पुढील तपास बाळापूर पोलिस करीत आहेत.

