Prataprao Jadhav : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा वाढदिवस यंदा साधेपणाने आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाढदिवसाचा खर्च टाळून सेवेला प्राधान्य! खामगाव, मेहकर, लोणार येथे सेवा सप्ताहांतर्गत विविध उपक्रम
बुलढाणा : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा वाढदिवस यंदा साधेपणाने आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
खामगाव येथील मूकबधिर निवासी विद्यालय, दशहरा मैदान येथे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि गरजू लाभार्थ्यांना दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या सहाय्यभूत साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर राहणार असून, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत ८९० लाभार्थ्यांना सहाय्यभूत साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
या साहित्यामध्ये व्हीलचेअर, चार्जिंग सायकल, कर्णयंत्र, कुबड्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी कमोड चेअर, बसण्यासाठी कुशन यांसह विविध सहाय्यक साधनांचा समावेश आहे. वयोमानानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक क्षमतेवर मर्यादा येतात. त्यामुळे त्यांना चालणे, उभे राहणे तसेच दैनंदिन कामे स्वावलंबीपणे करणे अडचणीचे ठरते. अशा नागरिकांना आवश्यक सहाय्यभूत साहित्य उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवन अधिक सुलभ आणि स्वावलंबी करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
दरम्यान, मेहकर येथे ‘जीना सीखो’ कार्यक्रमांतर्गत आयोजित तीन दिवसीय आयुर्वेदिक शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या शिबिरात आयुर्वेदिक चिकित्सापद्धतीद्वारे रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. तसेच आचार्य मनीषजी हे दैनंदिन जीवनातील आयुर्वेदिक उपचारपद्धती, आरोग्यदायी आहार आणि निरोगी जीवनशैली याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
याशिवाय, सोमवारी सायंकाळी लोणार येथील श्री मंगल कार्यालयात हरिभक्त परायण श्री रामरावजी महाराज ढोक यांच्या जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक विचारांचे श्रवण करण्याची संधी मिळणार आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव ठेवून वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साहित्याचे वाटप, आरोग्यविषयक उपक्रम तसेच आध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून, या उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

