19 brass of sand seized : परिसरात अवैध रेतीसाठा आणि मुरुमाच्या अवैध वाहतुकीचे प्रकार वाढत असतानाच महसूल विभागाने रविवारी धडक कारवाई करत तब्बल १९ ब्रास रेतीसाठा जप्त केला. नायब तहसीलदार विवेक नालट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत वेगवेगळ्या ठिकाणांहून रेती जप्त करण्यात आली. यातील ८ ब्रास रेतीचा मालक कोण, हे स्पष्ट न झाल्याने हा साठा पुढील कार्यवाहीसाठी ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आला आहे. मात्र, या कारवाईपूर्वीच ढिगारे रातोरात गायब झाल्याची चर्चा परिसरात सुरू झाल्याने महसूल विभागाच्या कारवाईच्या नियोजनाबाबत आणि गोपनीयतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

रेती तस्करांना छाप्याची आधीच चाहूल? डोणगावात १९ ब्रास रेती जप्त, माहिती फुटल्याच्या चर्चेने खळबळ!
डोणगाव : परिसरात अवैध रेतीसाठा आणि मुरुमाच्या अवैध वाहतुकीचे प्रकार वाढत असतानाच महसूल विभागाने रविवारी धडक कारवाई करत तब्बल १९ ब्रास रेतीसाठा जप्त केला. नायब तहसीलदार विवेक नालट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत वेगवेगळ्या ठिकाणांहून रेती जप्त करण्यात आली. यातील ८ ब्रास रेतीचा मालक कोण, हे स्पष्ट न झाल्याने हा साठा पुढील कार्यवाहीसाठी ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आला आहे. मात्र, या कारवाईपूर्वीच ढिगारे रातोरात गायब झाल्याची चर्चा परिसरात सुरू झाल्याने महसूल विभागाच्या कारवाईच्या नियोजनाबाबत आणि गोपनीयतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
महसूल पथकाची विविध ठिकाणी छापेमारी
मिळालेल्या माहितीनुसार, डोणगाव परिसरात अनेक ठिकाणी विनापरवाना रेती आणून तिचे साठे करण्यात आल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे रविवारी नायब तहसीलदार विवेक नालट यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात मंडळाधिकारी अनुप नरोटे आणि ग्राम महसूल अधिकारी अमोल राठोड यांचा समावेश होता.
पथकाने परिसरातील संशयित ठिकाणी पाहणी करून छापेमारी केली. या कारवाईदरम्यान एकूण १९ ब्रास रेती आढळून आली. महसूल विभागाने हा संपूर्ण साठा जप्त केला. यापैकी ८ ब्रास रेतीचा मालक कोण आहे, याची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे संबंधित रेतीसाठा ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे.
ढिगारे रातोरात गायब; कारवाईची माहिती फुटल्याची चर्चा!
दरम्यान, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिसरात आणखी एक चर्चा रंगू लागली आहे. स्थानिकांच्या चर्चेनुसार, ढिंग नदीपात्रातून आणून काही ठिकाणी शेकडो ब्रास रेतीचे मोठमोठे ढिगारे साठवून ठेवण्यात आले होते. मात्र, महसूल विभागाच्या छाप्याची चाहूल लागताच संबंधित रेतीसाठे रातोरात हटविण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
जर खरोखरच मोठ्या प्रमाणात रेतीसाठे हटविण्यात आले असतील, तर महसूल विभागाच्या कारवाईची माहिती संबंधितांपर्यंत आधीच कशी पोहोचली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पथकाच्या हालचालींची माहिती कुणाकडून बाहेर गेली का, याबाबतही नागरिकांमध्ये तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र, या चर्चेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची वस्तुस्थिती महसूल प्रशासनाने स्पष्ट करण्याची गरज व्यक्त होत आहे.
रेतीसाठ्यांबरोबर मुरुमाच्या अवैध वाहतुकीचेही आव्हान
डोणगाव परिसरात केवळ रेतीसाठेच नव्हे, तर मुरुमाच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीची बेकायदेशीर लूट सुरू असताना महसूल विभागाने केवळ साठे जप्त करण्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता अवैध उत्खननाचे मूळ शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महसूल विभागाच्या रविवारच्या कारवाईमुळे अवैध रेतीसाठा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असली, तरी शेकडो ब्रास रेतीचे ढिगारे गायब झाल्याच्या चर्चेने या कारवाईच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे प्रशासन आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून अवैध रेती आणि मुरुम वाहतुकीला आळा घालण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे डोणगाव परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

