Water extraction : साखरखेर्डा परिसरातील पाझर तलाव आणि सिंचन तलावांमध्ये उपलब्ध असलेला अत्यल्प पाणीसाठा वन्यप्राण्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी होत असतानाही काही तलावांमधून अद्याप मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे. हा उपसा तातडीने बंद करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

डिसेंबरअखेर तलाव कोरडे पडण्याची भीती; वन्यप्राण्यांसाठी पाणीसाठा राखण्याची मागणी
साखरखेर्डा : साखरखेर्डा परिसरातील पाझर तलाव आणि सिंचन तलावांमध्ये उपलब्ध असलेला अत्यल्प पाणीसाठा वन्यप्राण्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी होत असतानाही काही तलावांमधून अद्याप मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे. हा उपसा तातडीने बंद करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
साखरखेर्डा परिसरातील अनेक गावांमध्ये पाझर तलाव आणि सिंचन तलाव आहेत. मात्र, यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने एकही पाझर तलाव किंवा सिंचन तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. काही तलावांमधील विद्युत मोटारी काढण्यात आल्या असल्या, तरी काही ठिकाणी अद्याप मोटारींच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात आहे.
या परिसरात अनेक शेतकऱ्यांकडे पाळीव गुरेढोरे आहेत. त्याचबरोबर रोही, हरीण, रानडुक्कर, ससे, मोर यांसह विविध वन्यप्राणीही आढळतात. पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटत असल्याने या वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत तलावांमधील उर्वरित पाणीसाठा वन्यप्राण्यांसाठी राखीव ठेवावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
मात्र, ग्रामपंचायत आणि महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून पाणी उपसा रोखण्यासाठी ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाणी उपसा असाच सुरू राहिल्यास डिसेंबरअखेर एकाही तलावात पाणीसाठा शिल्लक राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
तलावांमधील उर्वरित पाणी वन्यजीवांसाठी उपलब्ध राहावे, यासाठी सुरू असलेला अनधिकृत पाणी उपसा तातडीने बंद करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी सरपंच कमलाकर गवई यांनी पत्रकाद्वारे केली आहे. आता महसूल विभागाचे कर्मचारी आणि संबंधित प्रशासन यावर काय कारवाई करतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

