woven dreams : प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे आयुष्यभराची साथ आणि प्रेम म्हणजे सुख-दुःखात एकमेकांचा आधार! याच भावनेने एका २१ वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकरावर जीवापाड विश्वास ठेवला. त्याच्यासोबत संसार थाटण्याची स्वप्ने पाहिली. जगण्यामरण्याच्या आणाभाका घेतल्या. मात्र, ज्या व्यक्तीच्या हातात तिने आपल्या आयुष्याची दोरी सोपवली, त्याच व्यक्तीने तिच्या भावनांचा, विश्वासाचा आणि असहायतेचा गैरफायदा घेत तिच्या शरीराचा सौदा केला. दारूच्या व्यसनासाठी प्रियकरानेच प्रेयसीला देहव्यवसायाच्या अंधाऱ्या वाटेवर ढकलल्याची धक्कादायक घटना वर्धा शहरात उघडकीस आली. पोलिसांच्या कारवाईनंतर या तरुणीच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला असून, प्रेमाच्या नावाखाली झालेल्या या विश्वासघाताने माणुसकीलाही काळिमा फासला आहे.

प्रेमाच्या आणाभाका, लग्नाचे स्वप्न अन् विश्वासघाताची काळी कहाणी; प्रियकराकडून प्रेयसीला देहव्यवसायात ढकलले
नागपूर : प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे आयुष्यभराची साथ आणि प्रेम म्हणजे सुख-दुःखात एकमेकांचा आधार! याच भावनेने एका २१ वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकरावर जीवापाड विश्वास ठेवला. त्याच्यासोबत संसार थाटण्याची स्वप्ने पाहिली. जगण्यामरण्याच्या आणाभाका घेतल्या. मात्र, ज्या व्यक्तीच्या हातात तिने आपल्या आयुष्याची दोरी सोपवली, त्याच व्यक्तीने तिच्या भावनांचा, विश्वासाचा आणि असहायतेचा गैरफायदा घेत तिच्या शरीराचा सौदा केला. दारूच्या व्यसनासाठी प्रियकरानेच प्रेयसीला देहव्यवसायाच्या अंधाऱ्या वाटेवर ढकलल्याची धक्कादायक घटना वर्धा शहरात उघडकीस आली. पोलिसांच्या कारवाईनंतर या तरुणीच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला असून, प्रेमाच्या नावाखाली झालेल्या या विश्वासघाताने माणुसकीलाही काळिमा फासला आहे.
वर्धा शहरातील आर्वी नाका परिसरातील कारला रोडवरील दर्श रेसिडेन्सी येथे राहणारा आरोपी तुषार प्रमोद फुलकारी (वय ३२) हा एका नामांकित महाविद्यालयात एम.एस्सी.चे शिक्षण घेत होता. त्याच महाविद्यालयात पुलगाव येथील २१ वर्षीय तरुणी निशा (काल्पनिक नाव) बी.एस्सी.चे शिक्षण घेत होती. महाविद्यालयीन परिचयातून दोघांची मैत्री झाली. हळूहळू फोनवरील संवाद, इन्स्टाग्रामवरील गप्पा आणि भेटीगाठींचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.
आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या निशाच्या आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या जवळिकीने प्रेम व्यक्त करणारी व्यक्ती आली होती. त्यामुळे तिने तुषारवर मनापासून विश्वास ठेवला. त्याच्या प्रेमात ती इतकी गुंतली की, त्याच्यासाठी कोणतीही तडजोड करण्यास तयार झाली. तुषारचा फोन आला की, इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून ती त्याला भेटण्यासाठी धाव घेत असे. प्रेम, लग्नाची आश्वासने आणि आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाकांनी तिच्या मनात सुखी संसाराचे स्वप्न आकार घेत होते. मात्र, हे स्वप्न किती भयानक वास्तवात बदलणार आहे, याची तिला कल्पनाही नव्हती.
दारूच्या व्यसनाने प्रेमसंबंधांना काळी किनार
तुषारवरील प्रेमापोटी निशाने आपले शिक्षणही अर्धवट सोडले. आज ना उद्या तुषार आपल्याशी लग्न करेल आणि आपण सुखी संसार सुरू करू, या आशेवर ती होती. मात्र, याच काळात उच्चशिक्षित असलेल्या तुषारला दारूचे व्यसन जडले. बेरोजगार असलेल्या तुषारने दारूच्या खर्चासाठी निशाकडे पैशांची मागणी सुरू केली. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही निशा त्याच्यासाठी जमतील तसे पैसे खर्च करू लागली. त्याचे व्यसन वाढत गेले आणि त्यासाठी तुषार कर्ज व उसनवारीचाही आधार घेऊ लागला. प्रेमाच्या नात्यातील विश्वासाचा आधार घेत तो तिचे आर्थिक शोषण करू लागला.
प्रेमाचा मुखवटा उतरला; प्रेयसीच्या असहायतेचा सौदा!
दारूचे व्यसन वाढत गेले तसे तुषारच्या वागण्यातही क्रूरता येऊ लागली. ज्या निशाने त्याच्यावर सर्वस्वाने विश्वास ठेवला होता, त्याच निशावर त्याने मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. मित्रांकडून घेतलेल्या पैशांच्या परतफेडीच्या नावाखाली त्याने तिला या कृत्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.
प्रेमाच्या नात्यात अडकलेल्या आणि लग्नाच्या आशेवर जगणाऱ्या निशाला सुरुवातीला या परिस्थितीचे गांभीर्य उमगले नाही. मात्र, तुषारने तिच्या भावनांचा गैरफायदा घेत तिच्यावर दबाव वाढवला. अखेर तिला देहव्यवसायाच्या दलदलीत ढकलण्यात आले. ज्या व्यक्तीसोबत तिने आयुष्याची स्वप्ने रंगवली, त्याच व्यक्तीने तिच्या आयुष्याचा असा सौदा केल्याने तिच्या विश्वासाचा पूर्णपणे चुराडा झाला.
पोलिसांचा सापळा; प्रेमाच्या नावाखालील काळा व्यवहार उघड
तुषार हा निशाकडून देहव्यवसाय करवून घेत असल्याची गोपनीय माहिती एसएसबीचे पोलीस निरीक्षक दर्शन पाटील आणि पोलीस हवालदार प्रकाश माथनकर यांना मिळाली. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला.
मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास छत्रपती चौकात तुषारने बनावट ग्राहकाकडून पैसे स्वीकारले आणि त्यानंतर निशाला त्याच्यासोबत पाठवले. पोलिसांनी तत्काळ छापा टाकून तुषार आणि निशाला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तुषारला अटक करण्यात आली.
या संपूर्ण प्रकारात सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे प्रेमाच्या नावाखाली विश्वास ठेवलेल्या व्यक्तीकडूनच निशाची झालेली फसवणूक. ज्या हातात हात घालून तिने सुखी संसाराची स्वप्ने पाहिली होती, त्याच हातांनी तिचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची वेळ तिच्यावर आली. सध्या निशा महिला सुधारगृहात असून, तिच्या आयुष्यातील या कटू अनुभवाने तिच्या स्वप्नांचा आणि प्रेमावरील विश्वासाचा चुराडा झाला आहे.

