Mahabreaking

[breaking_news]

Rohit Pawar :आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या आदित्यच्या आयुष्याला रोहित पवारांचा आधार! शिक्षणापासून नोकरीपर्यंतची जबाबदारी स्वीकारली

Rohit Pawar : नियतीच्या कठोर आघातामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या १३ वर्षीय आदित्य काकरवाल याच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण निर्माण झाला आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर पोरका झालेल्या आदित्यच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार धावून आले आहेत. आदित्यच्या शिक्षणापासून ते नोकरी मिळेपर्यंतच्या संगोपनाची आणि संपूर्ण खर्चाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे साखरखेर्डा परिसरातून समाधान व्यक्त होत असून, एका निराधार बालकाला भविष्याची नवी उमेद मिळाली आहे.

Rohit Pawar

 नियतीने हिरावले आई-वडील, रोहित पवारांनी दिला भविष्याचा आधार; १३ वर्षीय आदित्यच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली

अशोक इंगळे

साखरखेर्डा : नियतीच्या कठोर आघातामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या १३ वर्षीय आदित्य काकरवाल याच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण निर्माण झाला आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर पोरका झालेल्या आदित्यच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार धावून आले आहेत. आदित्यच्या शिक्षणापासून ते नोकरी मिळेपर्यंतच्या संगोपनाची आणि संपूर्ण खर्चाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे साखरखेर्डा परिसरातून समाधान व्यक्त होत असून, एका निराधार बालकाला भविष्याची नवी उमेद मिळाली आहे.

साखरखेर्डा येथील प्रभाग क्रमांक सहामध्ये राहणारे सुधीर माणिकलाल काकरवाल आणि त्यांच्या पत्नी रत्ना सुधीर काकरवाल यांना अपत्य नव्हते. त्यामुळे त्यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी अनाथाश्रमातून एका बालकाला दत्तक घेतले होते. त्याचे नाव आदित्य असे ठेवण्यात आले. मात्र, नियतीने या कुटुंबावर वारंवार आघात केले. १३ जून २०१७ रोजी रत्ना काकरवाल यांचे पोटाच्या आजाराने निधन झाले. त्यावेळी आदित्य अवघ्या तीन वर्षांचा होता. लहान वयातच त्याच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले.

आईच्या निधनानंतर आजी आणि वडील सुधीर यांनी आदित्यचा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. मात्र, काही दिवसांपूर्वी आजोबांचेही निधन झाले. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी सुधीर काकरवाल यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यामुळे अवघ्या १३ वर्षांच्या आदित्यच्या डोक्यावरील वडिलांचेही छत्र हरपले. घरात केवळ आजी आणि आदित्य असे दोघेच उरले. आई-वडील आणि आजोबांच्या निधनामुळे या बालकाच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

रामभाऊ जाधव यांच्या पुढाकारातून आदित्यला मिळाला आधार

आदित्यवर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगाची माहिती माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी ४ नोव्हेंबर रोजी साखरखेर्डा येथे आलेले आमदार रोहित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. आदित्यची परिस्थिती समजल्यानंतर रोहित पवार यांनी तातडीने त्याच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. आदित्यला दत्तक घेण्याचा निर्णय जाहीर करत त्याच्या पुढील आयुष्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

शिक्षणापासून नोकरीपर्यंत संपूर्ण जबाबदारी

आदित्यला बारामती येथील शिक्षण संस्थेत ठेवून त्याच्या निवासाची आणि संपूर्ण शिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच त्याला नोकरी मिळेपर्यंत त्याच्या संगोपनासह आवश्यक खर्चाची जबाबदारीही उचलण्याची ग्वाही आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या आदित्यला पुन्हा एकदा सुरक्षित भविष्याची आशा निर्माण झाली आहे.

रामभाऊ जाधव यांनी आदित्यच्या भविष्याबाबत दाखविलेली तळमळ आणि योग्य वेळी केलेला पुढाकार यामुळेच ही मदत शक्य झाली. येत्या काही दिवसांत रामभाऊ जाधव आणि सरपंचपती अमित जाधव हे आदित्यला घेऊन बारामती येथे जाणार असून, त्याच्या पुढील शिक्षण व संगोपनासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करणार असल्याची माहिती रामभाऊ जाधव यांनी दिली.

माणुसकीच्या निर्णयाचे साखरखेर्ड्यातून स्वागत

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या एका निराधार बालकाच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखविणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या निर्णयाचे साखरखेर्डा येथील नागरिकांनी स्वागत केले आहे. केवळ आर्थिक मदत न करता आदित्यच्या शिक्षणापासून स्वावलंबी होईपर्यंत साथ देण्याची भूमिका त्यांनी घेतल्याने परिसरातून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

दुःखाच्या काळात एखाद्याला दिलेला आधार त्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो, याची प्रचिती आदित्यच्या निमित्ताने आली आहे. नियतीच्या आघाताने पोरका झालेल्या या बालकाला आता नव्या भविष्याची आशा मिळाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top