Mahabreaking

[breaking_news]

Leprosy detection :बुलढाणा जिल्ह्यात कुष्ठरोग शोधमोहीम; ५ लाख ८३ हजार नागरिकांची तपासणी, २४ नवीन रुग्णांचे निदान!

Leprosy detection : बुलढाणा जिल्ह्यात १४ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्हा कुष्ठरोग विभागामार्फत FLC व सहवासित सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले आणि सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. हरी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.

Leprosy

घरोघरी आरोग्य पथकांची धडक; बुलढाणा जिल्ह्यातील कुष्ठरोग सर्वेक्षणातून २४ नवीन रुग्ण समोर

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात १४ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्हा कुष्ठरोग विभागामार्फत FLC व सहवासित सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले आणि सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. हरी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.

या मोहिमेसाठी विशेष प्रशिक्षित पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. पुरुषांची तपासणी करण्यासाठी आरोग्य सेवक, तर महिलांची तपासणी करण्यासाठी आरोग्य सेविका व आशा सेविकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकांनी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली.

आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा सेविकांच्या माध्यमातून FLC अंतर्गत एकूण ५ लाख ५६ हजार ४१ नागरिकांची, तर सहवासित सर्वेक्षण मोहिमेंतर्गत २७ हजार २४३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. FLC तपासणीदरम्यान १ हजार ९९३ संशयित रुग्ण आढळून आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची सखोल तपासणी केल्यानंतर १९ नवीन कुष्ठरुग्णांचे निदान झाले. या सर्व रुग्णांवर तातडीने औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे सहवासित सर्वेक्षणादरम्यान ६०३ संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी वैद्यकीय तपासणीनंतर पाच नवीन कुष्ठरुग्णांचे निदान करण्यात आले असून, त्यांच्यावरही त्वरित उपचार सुरू करण्यात आले आहेत. अशा प्रकारे या संपूर्ण मोहिमेत एकूण २४ नवीन कुष्ठरुग्णांचे निदान झाले आहे.

या मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र चांडोळच्या कार्यक्षेत्रातील वरुड येथील पेनांग साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड, माईनगर येथील कर्मचारी व कामगारांचीही तपासणी करण्यात आली. याशिवाय ऊस वाहतूक करणारे ट्रक व ट्रॅक्टरचालक तसेच कारखाना परिसरातील कामगारांच्या कुटुंबीयांची कुष्ठरोग तपासणी करण्यात आली. साखर कारखान्याशी संबंधित एकूण १०५ जणांची या मोहिमेदरम्यान तपासणी करण्यात आली.

या सर्वेक्षण मोहिमेत सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा सेविकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

कुष्ठरोगाचे वेळीच निदान झाल्यास त्यावर प्रभावी उपचार करणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या शरीरावर संशयास्पद डाग किंवा कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष न करता त्वरित जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top