donated to school :आईच्या तेरवीचा खर्च शाळेच्या विकासासाठी! अशोक खरात यांनी मातृस्मृती जपली ११ हजार १११ रुपयांच्या मदतीतून

आईच्या आठवणींना शिक्षणसेवेची जोड; तेरवीच्या दिवशी शाळेला ११ हजार १११ रुपयांची मदत, खरात कुटुंबाचा आदर्श!
साखरखेर्डा: आईच्या निधनाचे दुःख मनात असतानाही तिच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला प्राधान्य देत पत्रकार अशोक खरात यांनी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. आईच्या तेरवीच्या दिवशी होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी शाळेच्या रंगरंगोटीसाठी ११ हजार १११ रुपयांची आर्थिक मदत दिली. दुःखाच्या प्रसंगालाही समाजोपयोगी कार्याची जोड देत त्यांनी शिंदी गावासमोर सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श ठेवला आहे.
शिंदी येथील सरपंच सौ. साधनाताई अशोक खरात यांच्या सासूबाई आणि पत्रकार अशोक खरात यांच्या मातोश्री स्व. अनुसयाबाई आत्माराम खरात यांचे २४ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्या माजी पंचायत समिती उपसभापती स्व. आत्मारामबापू खरात यांच्या पत्नी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालिका होत्या. २७ ऑक्टोबर रोजी त्यांचा रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम पार पडला, तर ३ नोव्हेंबर रोजी तेरवीचा कार्यक्रम मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने संपन्न झाला.
दरम्यान, शिंदी येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेचा कायापालट करण्यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. या सामाजिक उपक्रमाला हातभार लावत अशोक खरात यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मृती जपण्यासाठी शाळेच्या रंगरंगोटीसाठी ११ हजार १११ रुपयांचा धनादेश शाळेचे मुख्याध्यापक रियाज सय्यद यांच्याकडे सुपूर्द केला.
धार्मिक कार्यक्रमांवर होणारा अनावश्यक खर्च टाळून तोच पैसा शिक्षणासारख्या समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करण्याचा खरात कुटुंबीयांचा निर्णय निश्चितच अनुकरणीय आहे. आईच्या आठवणी केवळ स्मरणात न ठेवता शिक्षणाच्या माध्यमातून त्या कायम जिवंत राहाव्यात, या उदात्त भावनेतून केलेले हे योगदान उपस्थितांच्या मनाला भावणारे ठरले. आईच्या निधनानंतर तिच्या स्मृती जपण्याचा यापेक्षा अधिक विधायक मार्ग कोणता, असा सकारात्मक संदेशही या उपक्रमातून समाजाला मिळाला आहे.
विशेष म्हणजे, अशोक खरात यांनी यापूर्वीही शाळेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शाळेच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी त्यांनी १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले होते. तसेच शाळेच्या इतर विकासकामांसाठी पाच लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करून घेण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गावातील शैक्षणिक सुविधा सक्षम व्हाव्यात आणि विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
आईच्या निधनाचे दुःख एका बाजूला आणि तिच्या स्मृतीतून समाजासाठी काहीतरी विधायक करण्याची तळमळ दुसऱ्या बाजूला, अशा भावनिक वातावरणात खरात कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय शिंदी गावासाठी प्रेरणादायी ठरला आहे. मातृऋणाची जाणीव ठेवत शिक्षणाच्या मंदिरासाठी केलेले हे योगदान खऱ्या अर्थाने मातृस्मृतीला अभिवादन करणारे आहे.
यावेळी पत्रकार अशोक खरात, डॉ. दिलीपराव खरात, अनिल खरात, सरपंच सौ. साधना खरात, सौ. शशिकला जाधव, सौ. सुनीता वैराळ, बाबुराव जाधव, विजय वैराळ आणि गंभीरराव खरात उपस्थित होते.

