A cruel twist : बुलढाणा तालुक्यातील पाडळी येथील प्रतीक्षा विवेक शिरसाट (वय १४) या युवतीचा भीषण कार अपघातात जागीच मृत्यू झाला, तर तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना बुलढाणा-अजिंठा मार्गावरील मिलिटरी स्कूलजवळ घडली. या घटनेमुळे पाडळी गावावर शोककळा पसरली आहे.

मिलिटरी स्कूलजवळ दोन कारची समोरासमोर धडक; १४ वर्षीय युवती ठार, आई-वडील गंभीर जखमी
पाडळी : बुलढाणा तालुक्यातील पाडळी येथील प्रतीक्षा विवेक शिरसाट (वय १४) या युवतीचा भीषण कार अपघातात जागीच मृत्यू झाला, तर तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 ते साडे सात वाजेच्या दरम्यान बुलढाणा-अजिंठा मार्गावरील मिलिटरी स्कूलजवळ घडली. या घटनेमुळे पाडळी गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा येथून पाडळीकडे येणारी अल्टो कार (क्रमांक एमएच १२ एएन ९६६६) मिलिटरी स्कूलजवळ आली असता, समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारने या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अल्टो कारमधून प्रवास करणारी प्रतीक्षा विवेक शिरसाट हिचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात प्रतीक्षाचे वडील विवेक संतोष शिरसाट (वय ४०) आणि आई किरण विवेक शिरसाट (वय ३५) हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, या अपघाताचा पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

