Mahabreaking

[breaking_news]

RTO cracks down :चाकरमान्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्यांना आरटीओचा हिसका! ४८ बस तपासल्या, ५८ हजारांचा दंड वसूल

RTO cracks down : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी आर्थिक लूट रोखण्यासाठी बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी भाडेवाढीविरुद्ध विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली असून, एकाच दिवसात ५८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

RTO

  खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी भाडेवाढीला लगाम; पवन नवाडेंच्या नेतृत्वात बुलढाणा आरटीओची धडक मोहीम

बुलढाणा : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी आर्थिक लूट रोखण्यासाठी बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी भाडेवाढीविरुद्ध विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली असून, एकाच दिवसात ५८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

खासगी बसच्या भाडेवाढीवर ५० टक्क्यांची मर्यादा!

दिवाळी सणात मोठ्या संख्येने नागरिक आपापल्या गावी जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडतात. प्रवाशांच्या या गर्दीचा फायदा घेत काही खासगी बसचालक आणि मालकांकडून अवाजवी भाडे आकारले जाते. परिणामी सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या निर्णयानुसार खासगी कंत्राटी बसचे भाडे हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) त्याच मार्गावरील टप्पा वाहतुकीच्या प्रति किलोमीटर भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये, अशी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

वायुवेग पथकाची धडक; ९ वाहने दोषी

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी खासगी ट्रॅव्हल्सच्या व्यावसायिक ठिकाणी वायुवेग पथकाद्वारे प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सना मनमानी भाडे आकारू नये, तसेच एसटीच्या भाडेदरापेक्षा निर्धारित ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडू नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या.

या विशेष मोहिमेत एकूण ४८ खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९ वाहने नियमभंग करताना आढळून आली. संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई करून एकाच दिवसात ५८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ही मोहीम सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रघुवीरसिंग बिलावर यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक हरीश पवार, राजश्री चौधरी, आशीष इंगळे आणि जितेंद्र सोनवणे यांनी यशस्वीरीत्या राबविली.

जादा भाडे आकारल्यास आरटीओकडे तक्रार करा!

प्रवाशांकडून निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त भाडे आकारले जात असल्यास त्यांनी नजीकच्या आरटीओ कार्यालयात लेखी तक्रार करावी. तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलढाणा यांच्या dyrto.२८-mh@gov.in या ई-मेलवर नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, ट्रॅव्हल्सचे नाव, वाहन क्रमांक आणि तिकिटाचा फोटो जोडून तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ट्रॅव्हल्स मालकांनाही सक्त ताकीद

खासगी ट्रॅव्हल्स चालक व मालकांनी प्रवाशांची आर्थिक लूट होणार नाही, याची दक्षता घ्यावी. वाहनांचे परवाना, विमा, पीयूसी आणि फिटनेस प्रमाणपत्र यांसह सर्व आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणे किंवा परिवहन नियमांचे उल्लंघन करणे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही परिवहन विभागाने दिला आहे.

दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स चालकांवर आरटीओने कारवाईचा बडगा उगारल्याने प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top