ISRO flight educational trip:जिल्हा विकास योजना (नाविन्यपूर्ण उपक्रम) अंतर्गत अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता ६ वी ते ८ वीमधील ३० विद्यार्थ्यांसाठी (१५ मुले + १५ मुली) इस्रो, बेंगळुरू तसेच दक्षिण भारतातील महत्त्वाच्या वैज्ञानिक स्थळांना विमानवारीद्वारे शैक्षणिक भेटीची ‘विज्ञानवेध’ शैक्षणिक सहल मंजूर झाली आहे.

संजय तायडे
बोरगाव मंजू : जिल्हा विकास योजना (नाविन्यपूर्ण उपक्रम) अंतर्गत अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता ६ वी ते ८ वीमधील ३० विद्यार्थ्यांसाठी (१५ मुले + १५ मुली) इस्रो, बेंगळुरू तसेच दक्षिण भारतातील महत्त्वाच्या वैज्ञानिक स्थळांना विमानवारीद्वारे शैक्षणिक भेटीची ‘विज्ञानवेध’ शैक्षणिक सहल मंजूर झाली आहे.या सहलीसाठी वैज्ञानिक दृष्टीकोन असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता दोन टप्प्यात चाळणी व निवड परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पहिली तालुकास्तर चाळणी परीक्षा १७ नोव्हेंबर २०२५ रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली आहे.
तालुकानिहाय परीक्षा केंद्रे व विद्यार्थी संख्या
अकोला तालुका – बी.आर. हायस्कूल, अकोला : २५८ विद्यार्थी
अकोट तालुका – लालबहादूर शास्त्री ज्ञानपीठ, अकोट : २७१ विद्यार्थी
बाळापूर तालुका – जि.प. माध्यमिक शाळा, बाळापूर : ३०९ विद्यार्थी
बार्शी टाकळी तालुका – बाबासाहेब धाबेकर विद्यालय, बार्शी टाकळी : ५०२ विद्यार्थी
मुर्तीजापूर तालुका – हायस्कूल, मुर्तीजापूर : २९७ विद्यार्थी
पातुर तालुका – वसंतराव नाईक विद्यालय, पातुर : २१६ विद्यार्थी
तेल्हारा तालुका – सेठ बंसीधर विद्यालय, तेल्हारा : २०१ विद्यार्थी
एकूण २०५४ विद्यार्थी या चाळणी परीक्षेत सहभागी होत असून, प्रत्येक तालुक्यातून गुणानुक्रमे १५ मुले व १५ मुली अशा ३० विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी निवड होणार आहे.
परीक्षा गोपनीयतेने पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर उपशिक्षणाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याचे एक सदस्यीय भरारी पथक नेमण्यात आले आहे. प्रश्नपत्रिकेत गणित व विज्ञान या विषयांवर आधारित ५० प्रश्न असून वेळ १ तास ३० मिनिटे आहे.
जिल्हास्तरीय निवड चाचणी
सातही तालुक्यांतून निवड झालेल्या २१० विद्यार्थ्यांची निवड चाचणी २७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. यामधून १५ मुले व १५ मुली यांची अंतिम निवड इस्रो विमानवारी शैक्षणिक सहलीसाठी केली जाणार आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रमाकडे सर्वांचे लक्ष
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक अनुभूती देण्यासाठी हा उपक्रम प्रथमच राबविण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी मा. जिल्हाधिकारी वर्षा मीना (IAS) व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अनिता मेश्राम (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.
उपक्रमाचे नियंत्रक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा. रतनसिंग पवार तर अंमलबजावणीत विस्तार अधिकारी श्याम राऊत व अरविंद जाधव परिश्रम घेत आहेत.ही शैक्षणिक सहल डिसेंबर २०२५ च्या तिसऱ्या आठवड्यात प्रस्तावित असून, जिल्ह्यातील शिक्षण विभाग, पालक व विद्यार्थ्यांचे या नाविन्यपूर्ण उपक्रमाकडे मोठे लक्ष लागले आहे.

