fertilizers : अनुदानित रासायनिक खत खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांसमोर तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर येणार नाही. केंद्र शासनाच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) या मोबाईल-आधारित डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी सिंदखेड राजा तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोबाईलवरून खताचे बुकिंग करता येणार असून, संबंधित विक्रेत्याकडे क्यूआर कोड दाखवून खत खरेदी करता येणार आहे.

मोबाईलवर खताचे बुकिंग, क्यूआर कोड दाखवताच खरेदी; शेतकऱ्यांसाठी डिजिटल सुविधा
साखरखेर्डा : अनुदानित रासायनिक खत खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांसमोर तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर येणार नाही. केंद्र शासनाच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) या मोबाईल-आधारित डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी सिंदखेड राजा तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोबाईलवरून खताचे बुकिंग करता येणार असून, संबंधित विक्रेत्याकडे क्यूआर कोड दाखवून खत खरेदी करता येणार आहे.
साखरखेर्डा येथील प्रगत शेतकरी कृषी सेवा केंद्र आणि तिरुपती कृषी सेवा केंद्र येथे या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी जितेंद्र सानप, सचिन खरात, केंद्रचालक दिलीप लखोटिया आणि महाधन कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रणालीद्वारे सावंगी माळी येथील शेतकरी गजानन मोतीराम काळे आणि वरुडी येथील शेतकरी प्रकाश जनार्दन गवई यांना खतविक्री करून उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
मोबाईलवर खताचा साठा तपासा, बुकिंग करा!
सध्या कृषी सेवा केंद्रांवर ई-पॉस मशीनच्या माध्यमातून अनुदानित रासायनिक खतांची विक्री केली जाते. मात्र, खतांची उपलब्धता, वितरणातील पारदर्शकता आणि शेतकऱ्यांना वेळेत खते मिळावीत, या उद्देशाने केंद्र शासनाने एफएफएस ही डिजिटल प्रणाली विकसित केली आहे.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर येथे, तर दुसऱ्या टप्प्यात राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये ही प्रणाली लागू करण्यात आली. आता तिसऱ्या टप्प्यात २२ ऑक्टोबरपासून बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील उर्वरित भागांत या प्रणालीची अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे.
या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून जवळच्या खत विक्रेत्याकडील उपलब्ध साठ्याची माहिती घेता येणार आहे. त्यानंतर आवश्यक खताचे बुकिंग केल्यावर शेतकऱ्याला युनिक क्यूआर कोड आणि टोकन क्रमांक मिळेल. संबंधित खत विक्रेत्याकडे हा कोड दाखवून खरेदीची प्रक्रिया पूर्ण करता येईल. परिणामी, खत खरेदीसाठी लागणारा वेळ आणि श्रम वाचण्यास मदत होणार आहे.
पिकांच्या गरजेनुसार खतांच्या शिफारसी
एफएफएस प्रणालीमध्ये शेतातील क्षेत्रफळ आणि निवडलेल्या पिकाच्या आधारे आवश्यक खतांच्या शिफारसींची माहितीही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पिकांना आवश्यक असलेल्या खतांचे योग्य नियोजन करणे शेतकऱ्यांना सोपे होईल.
खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, उपलब्ध साठ्याची माहिती सुलभपणे मिळवून देणे आणि खतांच्या वितरणातील संभाव्य अनियमितता व काळाबाजाराला आळा घालणे, यासाठीही या प्रणालीची मदत होऊ शकते.
शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी ही काळजी घ्यावी
एफएफएस प्रणालीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक पूर्वतयारी करणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांचा फार्मर आयडी, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक आणि ओटीपीच्या माध्यमातून ॲपवरील नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तसेच गाव, जिल्हा, सर्व्हे क्रमांक, जमिनीचे क्षेत्रफळ आणि पीक यासंबंधीची माहिती भरून तिची पडताळणी करावी लागणार आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्डाशी मोबाईल क्रमांक संलग्न असल्याची खात्री करून घ्यावी. शेतकऱ्याऐवजी अन्य व्यक्ती खत खरेदीसाठी जाणार असल्यास त्या प्रतिनिधीचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि आवश्यक क्यूआर कोड सोबत असणे गरजेचे असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
क्यूआर कोडची वैधता केवळ ७२ तास
ॲपवर खताचे बुकिंग केल्यानंतर मिळणारा युनिक क्यूआर कोड किंवा टोकन क्रमांक केवळ तीन दिवस, म्हणजेच ७२ तासांसाठी वैध राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बुकिंग केल्यानंतर निर्धारित कालावधीत संबंधित खत विक्रेत्याकडून खत खरेदी करणे आवश्यक आहे.
सिंदखेड राजा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या नवीन डिजिटल प्रणालीचा लाभ घेण्यासाठी ॲपवर नोंदणी करावी आणि आधार कार्डाशी मोबाईल क्रमांक संलग्न असल्याची खात्री करून घ्यावी. कृषी विभागातील अधिकारी आणि खत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती करून त्यांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जितेंद्र सानप यांनी केले आहे.

