Sawangi Tekale : सावंगी टेकाळे येथील वैशाली बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमेला सुरू करण्यात आलेल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या नियमित वाचन व श्रवण उपक्रमाची अश्विनी पौर्णिमेला सांगता करण्यात आली. यानिमित्त गावातून ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिला व पुरुषांनी पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान केली होती.

प्रज्ञा, शील, करुणा आणि समतेचा जागर! सावंगी टेकाळेत ग्रंथवाचनाची सांगता
गजानन भालेकर
धोत्रा नंदाई : सावंगी टेकाळे येथील वैशाली बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमेला सुरू करण्यात आलेल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या नियमित वाचन व श्रवण उपक्रमाची अश्विनी पौर्णिमेला सांगता करण्यात आली. यानिमित्त गावातून ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिला व पुरुषांनी पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान केली होती.
वैशाली बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमेपासून नियमितपणे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन व श्रवण करण्यात येत होते. भगवान गौतम बुद्धांचे विचार समाजापर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या धम्मातील मानवतावादी मूल्यांची जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
भगवान गौतम बुद्धांनी जगाला प्रज्ञा, शील, करुणा आणि समतेचा मार्ग दाखविला. माणसाने अंधश्रद्धा व अज्ञानापासून दूर राहून विवेक, विचार आणि अनुभवाच्या आधारे सत्याचा शोध घ्यावा, असा संदेश बुद्धांनी दिला. द्वेषाला द्वेषाने नव्हे, तर प्रेमाने आणि करुणेने उत्तर द्यावे, सर्व प्राणिमात्रांबद्दल दया बाळगावी आणि जात, धर्म किंवा जन्माच्या आधारावर कोणाशीही भेदभाव करू नये, ही बुद्धांच्या धम्माची प्रमुख शिकवण आहे.
‘अप्प दीपो भव’ अर्थात ‘स्वतः स्वतःचा दीप व्हा’, हा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांनी प्रत्येक व्यक्तीने आपल्या विचारांना विवेकाची जोड देऊन योग्य-अयोग्य यांचा विचार करावा, अशी शिकवण दिली. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म आणि सम्यक आजीविका यांसह अष्टांगिक मार्गाचे आचरण करून दुःखमुक्तीचा मार्ग स्पष्ट केला. तसेच पंचशीलाच्या माध्यमातून प्राणिहिंसा न करणे, चोरी न करणे, अनैतिक आचरण टाळणे, असत्य न बोलणे आणि मादक पदार्थांपासून दूर राहणे, ही नैतिक जीवनाची मूल्ये सांगितली.
बुद्धांचा धम्म हा केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून माणसाला माणूस म्हणून जगण्याची, इतरांचा आदर करण्याची आणि समाजात समता, बंधुता व न्याय प्रस्थापित करण्याची शिकवण देतो. त्यामुळे बुद्धांचे विचार केवळ वाचनापुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे, हीच या ग्रंथवाचन उपक्रमाची खरी फलश्रुती असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
अश्विनी पौर्णिमेला ग्रंथवाचनाची सांगता झाल्यानंतर गावातून ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भजनी मंडळींनी आपल्या भजनांतून उपस्थितांची मने जिंकली. समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून ग्रंथवाचन उपक्रमाची सांगता केली.
या ग्रंथवाचन उपक्रमात रंगनाथ झोटे, ज्योती झोटे, वामन झोटे, सर्जेराव झोटे, शेषराव झोटे, सुनील झोटे, अशोक झोटे आणि दाजीबा झोटे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.
भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रसार, धम्माचे आचरण आणि समाजात मानवतेची मूल्ये रुजविण्याच्या दृष्टीने वैशाली बुद्ध विहारातील हा ग्रंथवाचन उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. यावेळी गावातील बौद्ध उपासक, उपासिका आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

