Mahabreaking

[breaking_news]

Amravati Teachers Constituency :अमरावती शिक्षक मतदारसंघाचा उद्या फैसला! २६ उमेदवारांचे भवितव्य मतमोजणीतून ठरणार

Amravati Teachers Constituency : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील राजकीय संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानानंतर मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी अमरावती येथील लोकशाही भवनात मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत रिंगणात असलेल्या २६ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतमोजणीतून स्पष्ट होणार असून, शिक्षक मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागतो, याकडे संपूर्ण अमरावती विभागाचे लक्ष लागले आहे.

Amravati

पहिल्या पसंतीपासून मतांच्या हस्तांतरणापर्यंत… शिक्षक मतदारसंघाच्या निकालाची मंगळवारी रंगणार खरी लढत!

बुलढाणा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील राजकीय संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानानंतर मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी अमरावती येथील लोकशाही भवनात मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत रिंगणात असलेल्या २६ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतमोजणीतून स्पष्ट होणार असून, शिक्षक मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागतो, याकडे संपूर्ण अमरावती विभागाचे लक्ष लागले आहे.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील ८१ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण ३३ हजार ३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, मतदानाची टक्केवारी ९२.२५ इतकी नोंदविण्यात आली आहे. शिक्षक मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने या निवडणुकीतील निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे. मात्र, केवळ मतदानाची टक्केवारी पाहून कोणत्या उमेदवाराला आघाडी मिळेल, याचा निष्कर्ष काढता येणार नाही. प्रत्यक्ष मतमोजणीनंतरच राजकीय चित्र स्पष्ट होईल.

१७५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती; मतमोजणी केंद्र सज्ज

मतमोजणीसाठी अमरावती येथील विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवनात सुसज्ज केंद्र उभारण्यात आले आहे. मतमोजणी कक्ष आणि स्ट्राँग रूमची व्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.

मतमोजणीसाठी १५२ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, अतिरिक्त २३ अधिकारी-कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण १७५ अधिकारी-कर्मचारी या प्रक्रियेसाठी सज्ज आहेत. मतमोजणी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

१४ टेबलांवर मतमोजणी; पाच जिल्हाधिकाऱ्यांकडे देखरेखीची जबाबदारी

भारत निवडणूक आयोगाने १४ टेबलांवर मतमोजणी आणि टपाली मतपत्रिकांसाठी स्वतंत्र एक टेबल ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. प्रत्येक टेबलवर चार अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असून, १४ टेबलांवर एकूण ५६ अधिकारी-कर्मचारी मतमोजणीचे काम पाहतील. प्रत्येक टेबलची जबाबदारी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असेल.

प्रत्येक तीन टेबलांवरील मतमोजणीच्या कामावर एका जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे नियंत्रण राहणार आहे. त्यानुसार अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांवर देखरेखीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक टेबलवर एक याप्रमाणे १४ सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.

अशी होणार मतमोजणी, निकाल असा होणार जाहीर

प्रत्यक्ष आकड्यांसह मतमोजणी कशी होते, हे आपण एका सोप्या काल्पनिक उदाहरणाद्वारे समजावून घेऊया.

समजा, एका शिक्षक मतदारसंघात मतदानामध्ये एकूण १०,००० वैध मते (Valid Votes) पडली आहेत आणि निवडणुकीच्या रिंगणात ४ उमेदवार उभे आहेत (अ, ब, क आणि ड).

 पायरी १: विजयासाठीचा कोटा (Quota) ठरवणे.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी किती मते (कोटा) लागतात, हे काढण्यासाठी झालेल्या मतदानातील एकूण वैध मतांना २ ने भागणे आणि त्यात १ मिळवणे. हे सुत्र कोटा निश्चित करण्यासाठी वापरले जाते.

याचा अर्थ, वरील उदाहरणात ज्या उमेदवाराला विजयाची माळ गळ्यात पडायची असेल, त्याला किमान ५,००१ मते मिळवणे बंधनकारक ठरते. हा कोटा निश्चित केला जातो.

 

पायरी २: पहिली फेरी – पहिल्या पसंतीची (First Preference) मते मोजणे.

पहिल्या फेरीत फक्त आणि फक्त ‘पसंती क्रमांक १’ (First Preference) ची मते मोजली जातात. समजा, पहिल्या फेरीत सर्व उमेदवारांना मिळालेली मते अशी आहेत:

उमेदवार ‘अ’ : ४,००० मते

उमेदवार ‘ब’ : ३,००० मते

उमेदवार ‘क’ : २,००० मते

उमेदवार ‘ड’ : १,००० मते

एकूण वैध मते : १०,०००

 

निकालाचे विश्लेषण : विजयासाठी ५,००१ मते हवी आहेत; पण पहिल्या फेरीत सर्वाधिक ४,००० मते मिळवूनही ‘अ’ उमेदवार ५,००१ च्या कोट्यापर्यंत पोहोचू शकलेला नाही. त्यामुळे पहिल्या फेरीत कोणीही विजयी ठरत नाही. आता दुसरी फेरी सुरू होते.

 

पायरी ३: दुसरी फेरी – सर्वात कमी मते असलेल्या उमेदवाराला बाद ठरवणे

दुसऱ्या फेरीत ज्या उमेदवाराला सर्वात कमी ‘पसंती क्रमांक १’ ची मते मिळाली आहेत, त्याला शर्यतीतून बाहेर (Eliminate) केले जाते.

इथे उमेदवार ‘ड’ याला सर्वात कमी म्हणजेच १,००० मते मिळाली आहेत. त्यामुळे ‘ड’ बाद केला जातो.

जर एकापेक्षा जास्त उमेदवारांना समसमान कमी मते मिळाली असतील तर पुढील लगतच्या फेरीत कमी मते पडली असतील त्या उमेदवाराला बाद करण्यात येते.

आता ‘ड’ ला मिळालेल्या त्या १,००० मतपत्रिका तपासून पाहिल्या जातात की, त्या मतदारांनी ‘पसंती क्रमांक २’ (Second Preference) कोणाला दिला आहे ?

 

समजा, ‘ड’ च्या त्या १,००० मतपत्रिकांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे झाले:

त्यातील ६०० मतदारांनी त्यांच्या पसंतीक्रमात दुसरा क्रमांक ‘अ’ ला दिला होता.

त्यातील ३०० मतदारांनी दुसरा क्रमांक ‘ब’ ला दिला होता.

उरलेल्या १०० मतपत्रिकांवर दुसरा पसंतीक्रम नव्हता किंवा तो अवैध (Invalid) ठरला.

 

आता ही मते संबंधित उमेदवारांच्या खात्यात जोडली जातात:

उमेदवार ‘अ’: ४,००० + ६०० (नवीन मते) = ४,६०० मते

उमेदवार ‘ब’: ३,००० + ३०० (नवीन मते) = ३,३०० मते

उमेदवार ‘क’: २,००० मते (जैसे थे)

 

स्थिती: अजूनही कोणालाही ५,००१ चा कोटा मिळालेला नाही (‘अ’ कडे ४,६०० मते आहेत). त्यामुळे मोजणी तिसऱ्या फेरीत जाते.

पायरी ४ : तिसरी फेरी-अतिशय महत्त्वाची फेरी

 

तिसऱ्या फेरीत आता उरलेल्या उमेदवारांपैकी ज्याला सर्वात कमी मते आहेत, त्याला बाहेर काढले जाईल.

आता उमेदवार ‘क’ कडे सर्वात कमी २,००० मते आहेत, त्यामुळे ‘क’ ला शर्यतीतून बाहेर केले जाते.

आता ‘क’ च्या त्या २,००० मतपत्रिका तपासल्या जातात आणि पाहिलं जातं की, त्यांच्यावर पुढचा पसंतीक्रम (उदा : दुसरा किंवा तिसरा) कोणाचा आहे.

समजा, ‘क’ च्या त्या २,००० मतांपैकी:

१,२०० मतांमध्ये पुढची पसंती ‘अ’ कडे गेलेली आढळली.

५०० मतांमध्ये पुढची पसंती ‘ब’ कडे गेलेली आढळली.

३०० मते दुसऱ्या कोणालाच पसंती न दिल्याने बाद झाली.

 

आता ही मते ‘अ’ आणि ‘ब’ च्या खात्यात जमा होतात:

उमेदवार ‘अ’: ४,६०० + १,२०० = ५,८०० मते

उमेदवार ‘ब’: ३,३०० + ५०० = ३,८०० मते

 

अंतिम निकाल:

आवश्यक असलेला ५,००१ चा कोटा ‘अ’ ने पार केला आहे! परिणामी, उमेदवार ‘अ’ ला विजयी घोषित केले जाते.

या आकडेवारीवरून काय स्पष्ट होते?

पहिल्या फेरीत ‘अ’ कडे फक्त ४,००० मते होती आणि ‘ब’ कडे ३,०००, तरीही पसंतीक्रमाच्या मतदानामुळे आणि मते हस्तांतरीत (Transfer) झाल्यामुळे ‘अ’ चा विजय सुकर झाला.  शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत म्हणूनच प्रत्येक पसंतीचा (१, २, ३…) कागद आणि मत अत्यंत महत्त्वाचे ठरते. हे विशेष.

राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला; निकालाकडे विभागाचे लक्ष

शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ही केवळ एका जागेची लढत नसून, शिक्षकांमधील संघटनात्मक ताकद, उमेदवारांचा संपर्क आणि राजकीय पाठबळ यांचीही परीक्षा मानली जाते. २६ उमेदवार रिंगणात असल्याने मतांचे विभाजन आणि पसंतीक्रमानुसार होणारी मतांची मोजणी यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

मात्र, कोणत्या उमेदवाराला किती राजकीय पाठिंबा मिळाला किंवा कोणत्या गटाचे पारडे जड आहे, याबाबत अधिकृत आकडेवारीशिवाय निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीतूनच उमेदवारांची प्रत्यक्ष ताकद स्पष्ट होईल.

उच्च मतदानाची नोंद, बहुसंख्य उमेदवारांची उपस्थिती आणि पसंतीक्रमावर आधारित मतमोजणीची प्रक्रिया यामुळे या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आता लोकशाही भवनातील मतमोजणीत कोण बाजी मारतो आणि शिक्षक मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडतो, याचे उत्तर मंगळवारी मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top