Mahabreaking

[breaking_news]

Teachers Constituency :शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबरला मतदान; अकोल्यात ५,९४२ मतदार ठरविणार लोकप्रतिनिधित्वाची दिशा!

Teachers Constituency : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, अकोला जिल्ह्यातील १३ मतदान केंद्रांवर एकूण ५ हजार ९४२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शिक्षकांचे प्रश्न, त्यांचे प्रतिनिधित्व आणि विधान परिषदेतील भूमिका या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Amravati

  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक निर्णायक टप्प्यात; अकोला जिल्ह्यात १३ मतदान केंद्रांवर मतदानाची तयारी

अकोला  : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, अकोला जिल्ह्यातील १३ मतदान केंद्रांवर एकूण ५ हजार ९४२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शिक्षकांचे प्रश्न, त्यांचे प्रतिनिधित्व आणि विधान परिषदेतील भूमिका या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार अमरावती विभागातील संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी केली आहे.

अकोला जिल्ह्यात १३ मतदान केंद्रे

अकोला जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. अकोट, तेल्हारा, अकोला शहर, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी या ठिकाणी शिक्षक मतदारांना मतदान करता येणार आहे.

अकोला जिल्ह्यातील मतदान केंद्रनिहाय मतदारसंख्या पुढीलप्रमाणे :

  • अकोट : मतदान केंद्र क्रमांक २६ — निवासी नायब तहसीलदार कार्यालय, तहसील कार्यालय, पोपटखेड रोड — ५१६ मतदार; मतदान केंद्र क्रमांक २७ — महसूल नायब तहसीलदार कार्यालय, तहसील कार्यालय, पोपटखेड रोड — ५०७ मतदार.
  • तेल्हारा : मतदान केंद्र क्रमांक २८ — संजय गांधी विभाग, तहसील कार्यालय — ३५० मतदार.
  • अकोला शहर : मतदान केंद्र क्रमांक २९, ३० आणि ३१ — राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, मूर्तिजापूर रोड, अनुक्रमे खोली क्रमांक १, २ आणि ३ — ४३७, ५९८ आणि ४७५ मतदार.
  • अकोला शहर : मतदान केंद्र क्रमांक ३२, ३३ आणि ३४ — सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिव्हिल लाईन, अनुक्रमे खोली क्रमांक १, २ आणि ३ — ४९४, ५१२ आणि ५०२ मतदार.
  • बाळापूर : मतदान केंद्र क्रमांक ३५ — पंचायत समिती सभागृह — ५०२ मतदार.
  • पातूर : मतदान केंद्र क्रमांक ३६ — नायब तहसीलदार (महसूल) यांचे दालन, तहसील कार्यालय — ३८३ मतदार.
  • मूर्तिजापूर : मतदान केंद्र क्रमांक ३७ — नायब तहसीलदार, मूर्तिजापूर संगांयो यांचे दालन, तहसील कार्यालय — ४४५ मतदार.
  • बार्शीटाकळी : मतदान केंद्र क्रमांक ३८ — पंचायत समिती सभागृह — २२१ मतदार.

या केंद्रांवरील मतदारसंख्या एकूण ५ हजार ९४२ असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. मतदान केंद्रांची अधिकृत यादी अकोला जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

पसंतीक्रम नोंदविताना विशेष काळजी आवश्यक

शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पसंतीक्रम पद्धतीने होत असल्याने मतपत्रिका भरताना मतदारांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. मतपत्रिकेसोबत देण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेनचाच वापर करावा. अन्य पेन, पेन्सिल किंवा बॉलपेनचा वापर करू नये.

मतदाराने पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात अंकांमध्ये ‘१’ हा पहिला पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. त्यानंतरचे पसंतीक्रम नोंदविणे ऐच्छिक आहे. प्रत्येक उमेदवारासमोर स्वतंत्र पसंतीक्रम नोंदवावा आणि एकच क्रमांक दोन उमेदवारांसमोर लिहू नये.

मतपत्रिकेवर स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव, अन्य शब्द, अंगठ्याचा ठसा किंवा टिकमार्क अथवा ‘X’ अशी खूण करू नये. नियमांचे पालन न केल्यास मतपत्रिका अवैध ठरण्याची शक्यता असल्याने मतदारांनी सूचनांचे काटेकोर पालन करावे.

मतदारांनी मतदान केंद्राची माहिती आधीच तपासावी

मतदारांना आपले नाव आणि मतदान केंद्राचा तपशील महाराष्ट्र निवडणूक विभागाच्या मतदार शोध सुविधेद्वारे तपासता येईल.

मतदार शोध संकेतस्थळ : https://mahaelection.gov.in/Citizen/Search

मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल फोन किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे व गॅझेट सोबत नेण्यास मनाई असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मतदानासाठी प्रशासन सज्ज

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी पथक नियुक्त करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी केंद्रांना भेटी देण्यासाठी संबंधित कार्यक्षेत्रातील उपविभागीय अधिकाऱ्यांची क्षेत्रीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागातील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील १३ मतदान केंद्रांसाठी १३ मतदान केंद्राध्यक्ष, ३९ मतदान अधिकारी आणि १३ मायक्रो ऑब्झर्व्हर नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रणा तैनात करण्यात येत आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत पात्र मतदारांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे सर्व पात्र शिक्षक मतदारांनी आपले नाव व मतदान केंद्र तपासून नियोजित वेळेत मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अकोला यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top