mangalsutra: शहरातील बालाजी महाराज मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. चार ग्रॅम वजनाचे आणि सुमारे २० हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र चोरीस गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दर्शनासाठी गेल्या अन् मंगळसूत्राला मुकल्या; बालाजी महाराज मंदिरात चोरीची घटना
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहरातील बालाजी महाराज मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. चार ग्रॅम वजनाचे आणि सुमारे २० हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र चोरीस गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपूर्वा वैभव वानखडे (वय ३०, व्यवसाय घरकाम, मूळ रा. जामठी, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला; सध्या रा. आदर्श कॉलनी, देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) या गुरुवारी सकाळी सुमारे ६.१२ वाजता बालाजी महाराज मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी मंदिरात गर्दी असताना त्यांच्या गळ्यातील चार ग्रॅम वजनाचे, २० हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तोडून चोरून नेले.
मंगळसूत्र चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरुवारी दुपारी १.४३ वाजता पोलिसांनी गुन्हा नोंदविला. या प्रकरणी अद्याप आरोपीची ओळख पटलेली नसून, त्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार सहायक पोलीस फौजदार नायबराव मोगल (बकल नंबर १७१६) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
मंदिरासारख्या गर्दीच्या धार्मिक स्थळांवर भाविकांच्या दागिन्यांची चोरी होण्याच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. दर्शनासाठी जाताना मौल्यवान दागिन्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

