Mahabreaking

[breaking_news]

Birds thirst: वन्यजीव सप्ताहानिमित्त पाखरांची दिवसभर भागणार तहान; मुन्ना शेख यांचा अनोखा ‘पाणपोई’ जुगाड

Birds thirst: अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर होत असलेली जंगलतोड आणि पक्ष्यांचा दिवसेंदिवस हरवत चाललेला अधिवास यामुळे अनेक पक्षी प्रजाती संकटात सापडल्या आहेत. अकोला जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने पक्ष्यांचा नैसर्गिक निवारा हिरावला जात आहे. अशा परिस्थितीत पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था करून त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न निसर्गप्रेमींकडून केला जात आहे.

Birds thirst

 एका स्टॅण्डवर पाच ते सात मातीची भांडी; पाखरांसाठी मुन्ना शेख यांची ‘रिसायकलिंग पाणपोई’

निशांत गवई

पातूर : अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर होत असलेली जंगलतोड आणि पक्ष्यांचा दिवसेंदिवस हरवत चाललेला अधिवास यामुळे अनेक पक्षी प्रजाती संकटात सापडल्या आहेत. अकोला जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने पक्ष्यांचा नैसर्गिक निवारा हिरावला जात आहे. अशा परिस्थितीत पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था करून त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न निसर्गप्रेमींकडून केला जात आहे.

सर्पमित्र निसर्ग संवर्धन व बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा निसर्गप्रेमी शेख महम्मद शेख मकबुल (मुन्ना शेख) यांनी पक्ष्यांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. आता त्यांनी पक्ष्यांच्या पाणपोईसाठी एक अभिनव ‘जुगाड’ तयार केला असून, या माध्यमातून पाखरांना दिवसभर पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

मुन्ना शेख हे दरवर्षी उन्हाळ्यातच नव्हे, तर वर्षभर आपल्या अंगणात पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था करतात. त्यांच्या या उपक्रमाचा लाभ अनेक पक्ष्यांना होताना दिसून येतो. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी मोफत वितरित करणाऱ्या शेख मुन्ना यांनी त्यानंतर पक्ष्यांसाठी लाकडी घरटी तयार करण्यास सुरुवात केली. प्लायवूडपासून तयार केलेली अनेक घरटी त्यांनी जिल्हाभरात मोफत वितरित केली.

यानंतर त्यांनी ‘पाखरांचे अपार्टमेंट’ ही अभिनव संकल्पना राबवून एकाच ठिकाणी अनेक पक्ष्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर टाकाऊ तेल-तुपाच्या पिंपांचा पुनर्वापर करून पक्ष्यांसाठी पाणपोई तसेच खाद्य ठेवण्यासाठी उपयुक्त पात्रे तयार केली. या पाणपोई व खाद्यपात्रांचे अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांत विविध ठिकाणी वितरण करण्यात आले.

आता वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून त्यांनी पक्ष्यांसाठी आणखी एक आगळी-वेगळी पाणपोई तयार केली आहे. देशभरात १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. यानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या या पाणपोईमध्ये लोखंडी स्टॅण्डचा वापर करण्यात आला असून, त्यावर पाच ते सात मातीची पाण्याची भांडी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या पाणपोईचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वांत खालच्या भांड्यात इलेक्ट्रिक मोटार बसविण्यात आली आहे. या मोटारीच्या माध्यमातून पाणी वरच्या सर्व पात्रांमध्ये पोहोचविले जाणार असून, त्यामुळे दिवसभर पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध राहण्यास मदत होणार आहे. तसेच भांड्यांमधून खाली गळणारे पाणी एका मडक्यात संकलित केले जाईल. हेच पाणी पुन्हा मोटारीच्या साहाय्याने वरच्या भांड्यांमध्ये पोहोचविले जाणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्ययही टाळता येणार आहे.

प्राथमिक स्तरावर प्रयोग

वन्यजीव सप्ताहानिमित्त सध्या प्राथमिक स्तरावर अशा प्रकारचा एकच स्टॅण्ड तयार करण्यात आला आहे. या प्रयोगाचे निरीक्षण करून त्याचा पक्ष्यांना किती फायदा होतो, पाणपोईला पक्ष्यांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि त्यामध्ये आणखी कोणते बदल करता येतील, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. या प्रयोगातून सकारात्मक परिणाम दिसून आल्यास अशा प्रकारचे आणखी स्टॅण्ड तयार करून विविध ठिकाणी बसविण्यात येतील, अशी माहिती निसर्गप्रेमी शेख मुन्ना यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top