Established parties : नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर देऊळगाव राजातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलताना दिसत आहेत. गेल्या पंचवीस ते तीस वर्षे शहरात सत्ता गाजवणाऱ्या प्रस्थापित पक्षांना यंदा नगराध्यक्षपद आणि प्रभागनिहाय उमेदवार मिळत नसल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. दीर्घकाळ एकनिष्ठ राहिलेले अनेक कार्यकर्ते रात्रीतून गोट बदलत असून, इच्छुकांना निर्णय घेता येत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

२५ वर्षापासून एकनिष्ठ असलेल्यांची रात्रीतून कोलांटउडी
गजानन तिडके
देऊळगाव राजा: नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर देऊळगाव राजातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलताना दिसत आहेत. गेल्या पंचवीस ते तीस वर्षे शहरात सत्ता गाजवणाऱ्या प्रस्थापित पक्षांना यंदा नगराध्यक्षपद आणि प्रभागनिहाय उमेदवार मिळत नसल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. दीर्घकाळ एकनिष्ठ राहिलेले अनेक कार्यकर्ते रात्रीतून गोट बदलत असून, इच्छुकांना निर्णय घेता येत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
तरुण आमदार कायंदेंच्या प्रभावाने प्रस्थापितांची झोप उडाली!
देऊळगाव राजा मतदारसंघातील दोन माजी आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रभाव गेल्या अनेक दशकांपासून कायम होता. सहकार क्षेत्र असो वा पालिका, उमेदवारांच्या रांगा त्यांच्या दारात लागत असत. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत तरुण आमदार मनोज कायंदे यांनी या दोन्ही माजी आमदारांना धूळ चारली. त्यानंतर प्रस्थापितांच्या तळात अस्वस्थता वाढली असून, सध्या दोन्ही नेते एकत्र येऊन गुप्त बैठकांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची आखणी करीत असल्याचे समोर आले आहे.
राजकीय प्रतिस्पर्धी असूनही आता एकत्र येणाऱ्या या दोघांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांत मात्र संभ्रम व घबराट निर्माण झाली आहे. कायंदे यांच्या वाढत्या लोकप्रियतेने आणि तरुणाईतील प्रभावाने हे प्रस्थापित नेते चिंतेत असून, “त्यांना थांबवले नाही तर भविष्यात अडचणी वाढतील” अशी जाणीव त्यांना झाली असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
राजकारणातील ‘एकनिष्ठतेला’ तडा!
माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे अनेक वर्षे वर्चस्व असलेले कार्यकर्ते आता सत्तेच्या समीकरणात आपली जागा मिळविण्यासाठी दुसऱ्या गोटात गेले आहेत. तर माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या गटात अंतर्गत कलह आणि पदाधिकाऱ्यांचा दुरावा दिसत असल्याने त्यांच्यासमोर उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे.
सर्व पक्षांत उमेदवारीचा खेळ रंगतोय!
नगराध्यक्षपद असो वा नगरसेवक पदे — सत्तेच्या हव्यासामुळे काही कार्यकर्त्यांनी सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष या दोन्हीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे स्थानिक नेतृत्वसमोर “तिकीट द्यायचं कोणाला?” असा प्रश्न उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांत गुप्त बैठकांचा पाऊस पडत असून, अंतिम निर्णय लांबला आहे.
नगराध्यक्षपद राखीव – प्रस्थापितांचे गणित गुंतले!
नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिला राखीव झाल्याने अनेक प्रस्थापित नेत्यांचे घरगुती लॉन्चिंग धुळीस मिळाले आहे. आता हेच नेते वार्डातून योग्य उमेदवार उभा करण्याच्या प्रयत्नात आहेत.
‘मॅरेथॉन बैठकांचे’ सत्र सुरू!
प्रमुख पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार यांच्यात शहरातील फार्महाऊस व हॉटेलांमध्ये सुरू असलेल्या सलग बैठकांमधूनही अद्याप अंतिम निर्णय बाहेर आला नाही. “पुढील दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल,” असे एका पक्षातील पदाधिकाऱ्याने सांगितले.
ओबीसी फॅक्टर ठरणार निर्णायक!
राज्यभर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी फॅक्टर निर्णायक ठरल्याचे दिसून आले. प्रस्थापितांऐवजी नव्या चेहऱ्यांना जनतेने पसंती दिली. त्याच धर्तीवर देऊळगाव राजा नगरपालिका क्षेत्रातही ओबीसी फॅक्टरची लाट दिसू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

