Mahabreaking

[breaking_news]

Mouli Sheludkar: फिरती चतुर्थीतून भक्ती, समता आणि एकोप्याचा संदेश; ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर यांचे प्रतिपादन

Mouli Sheludkar: अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त मासरूळ परिसरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. फिरती चतुर्थी उपक्रमांतर्गत गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

Mouli Sheludkar

  अंगारक संकष्टी चतुर्थीला गणेश मंदिरांत भाविकांची मांदियाळी; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

पंडीत सावळे

मासरूळ   : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त मासरूळ परिसरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. फिरती चतुर्थी उपक्रमांतर्गत गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला ‘अंगारक चतुर्थी’ असे म्हटले जाते. या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा-अर्चना केल्याने विघ्नांचे निवारण होऊन सुख, समृद्धी आणि शांती लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अंगारक चतुर्थीनिमित्त पहाटेपासूनच गणेश मंदिरांमध्ये भाविकांची वर्दळ सुरू होती.

भाविकांनी श्री गणेशाचे दर्शन घेऊन दुर्वा, लाल फुले, मोदक व लाडू अर्पण केले. अनेक भाविकांनी दिवसभर उपवास करून सायंकाळी श्री गणेशाची विधिवत पूजा केली. चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडण्याची परंपराही भाविकांनी भक्तिभावाने पाळली. त्यामुळे संपूर्ण परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण होते.

दरम्यान, फिरती चतुर्थी उपक्रमाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील समाजप्रबोधनात्मक विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून विश्वात्मक भक्ती, समता आणि बंधुभावाचा संदेश स्पष्ट केला.

संत तुकाराम महाराज म्हणतात—

“ऐसा ज्याचा अनुभव ।

विश्व देव सत्यत्वें ॥१॥

देव तया जवळी असे ।

पाप नासे दर्शने ॥ध्रु.॥

कामक्रोधा नाहीं चाली ।

भूतीं जाली समता ॥३॥

तुका म्हणे भेदाभेद ।

गेले वाद खंडोनि ॥४॥”

या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी विश्वात्मक भक्तीचा अत्यंत महत्त्वपूर्ण विचार मांडला आहे. संपूर्ण विश्वामध्ये परमेश्वराचे अस्तित्व जाणवणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक जीवामध्ये देवाचे दर्शन घडते. अशा भक्तीमुळे मनातील विकार दूर होऊन जीवनाला सात्त्विक दिशा मिळते. काम, क्रोध आणि अहंकार यांसारख्या विकारांवर मात करत प्रत्येक जीव समान आहे, अशी समतेची भावना निर्माण होते.

आजच्या सामाजिक परिस्थितीत जात-पात, उच्च-नीच आणि भेदाभेद विसरून मानवतेच्या भावनेने एकत्र येण्याची नितांत गरज आहे. संत तुकाराम महाराजांचा हा विचार समाजाला बंधुभाव, समता आणि विश्वात्मक भक्तीचा मार्ग दाखविणारा आहे. केवळ पूजा-अर्चना करण्यापेक्षा प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे दर्शन घेणे, सर्वांशी समानतेने वागणे आणि मनातील विकारांचा त्याग करणे, हीच खरी भक्ती असल्याचा संदेश या अभंगातून मिळतो.

फिरती चतुर्थी उपक्रमाच्या माध्यमातून गणरायाच्या भक्तीसोबतच संतविचारांचा जागर घडत असून, धार्मिक उपासनेला सामाजिक समता आणि मानवतेची जोड मिळत आहे. जिथे भेदाभेद संपतो, तिथेच खऱ्या भक्तीचा आणि परमात्म्याच्या अनुभूतीचा प्रारंभ होतो, हा संत तुकाराम महाराजांचा अनमोल संदेश या उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top