Mahabreaking

[breaking_news]

Mahadev Valley :महादेवाच्या खोऱ्यातील २५ एकर वनराईला संरक्षण कवच द्या; धरती बचाओ मिशनची मागणी

Mahadev Valley : शहराच्या पर्यावरणीय भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या महादेवाच्या खोऱ्यातील सुमारे २५ एकर क्षेत्रावर विकसित होत असलेल्या वनराईचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वनश्री जनाबापू द्वारका नामदेव मेहेत्रे यांच्यासह धरती बचाओ मिशन परिवाराने केली आहे. यासंदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले आहे.

Mahadev Valley

सीसीटीव्ही, २४ तास राखणदार अन् कायमस्वरूपी पाणीव्यवस्था; महादेवाच्या खोऱ्यासाठी नगरपरिषदेकडे निवेदन

गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहराच्या पर्यावरणीय भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या महादेवाच्या खोऱ्यातील सुमारे २५ एकर क्षेत्रावर विकसित होत असलेल्या वनराईचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वनश्री जनाबापू द्वारका नामदेव मेहेत्रे यांच्यासह धरती बचाओ मिशन परिवाराने केली आहे. यासंदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले आहे.
सामाजिक वनीकरण विभाग, देऊळगाव राजा नगरपरिषद, शाळा-महाविद्यालये, राष्ट्रीय हरित सेना तसेच लोकसहभागातून महादेवाच्या खोऱ्यात सुमारे २५ एकर क्षेत्रावर वनराई विकसित होत आहे. भविष्यात या परिसराचा ऑक्सिजन पार्क किंवा निसर्ग उद्यान म्हणून विकास केल्यास शहराच्या पर्यावरणीय समृद्धीत मोठी भर पडू शकते. मात्र, सध्या या वनराईच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या काही मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कुंपणाची दुरुस्ती अन् प्रवेशद्वाराची मागणी

वनराईच्या काही भागातील कुंपण तुटलेले असून, परिसरात प्रवेशद्वाराचीही पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे मोकाट जनावरे आणि बकऱ्या वनराईत प्रवेश करून रोपांचे नुकसान करण्याची शक्यता आहे. तसेच अतिक्रमणास प्रतिबंध करण्यासाठीही ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे संपूर्ण वनराईला मजबूत कुंपण करून तुटलेल्या भागांची तातडीने दुरुस्ती करावी आणि योग्य ठिकाणी प्रवेशद्वार उभारावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सीसीटीव्ही अन् २४ तास राखणदाराची गरज

वनराईचे संरक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणावा. तसेच वनराईच्या सुरक्षेसाठी २४ तास राखणदाराची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यामुळे वृक्षांचे नुकसान, अनधिकृत प्रवेश तसेच संभाव्य अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

कायमस्वरूपी पाणीव्यवस्थेची मागणी

वृक्षलागवडीनंतर त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी वनराईमध्ये सुसज्ज आणि कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मृत झालेल्या रोपांच्या जागी पुनर्लागवड करून केवळ वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धनाला प्राधान्य देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

‘ऑक्सिजन पार्क’ म्हणून विकास करा

महादेवाच्या खोऱ्यातील वनराईचे भविष्यात नियोजनबद्ध पद्धतीने ऑक्सिजन पार्क अथवा निसर्ग उद्यान म्हणून विकसित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांसाठी हे क्षेत्र पर्यावरणपूरक खुले ठिकाण ठरू शकते. त्यामुळे वनराईचे दीर्घकालीन संरक्षण व संवर्धन करण्यासाठी नगरपरिषदेने स्वतंत्र नियोजन करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शहराच्या हरित सौंदर्यीकरणावर भर

महादेवाच्या खोऱ्यापुरतेच मर्यादित न राहता शहरातील बायपास रोड, प्रमुख रस्ते, चौक, शाळा-महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांच्या परिसरात स्थानिक वातावरणाला अनुरूप व शोभिवंत वृक्षांची लागवड करावी. या माध्यमातून देऊळगाव राजा शहराचे हरित सौंदर्यीकरण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शाळा-महाविद्यालयांना पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता अभियानात सहभागी करून घेण्याची सूचनाही निवेदनात करण्यात आली आहे.

वृक्षकराचा निधी पर्यावरण संवर्धनासाठी वापरण्याची मागणी

नगरपरिषदेच्या माध्यमातून जमा होणारा वृक्षकराचा निधी पर्यावरण संवर्धन, वृक्षसंगोपन, स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित उपक्रमांसाठी प्रभावीपणे वापरण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरात यापूर्वी ज्या-ज्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे, त्या वृक्षांचे नियमित संगोपन, संरक्षण आणि आवश्यक ठिकाणी पुनर्लागवड होणे गरजेचे आहे. केवळ वृक्षारोपणाच्या संख्येपेक्षा लावलेल्या वृक्षांचे संगोपन आणि त्यांचे जतन याला प्राधान्य मिळावे, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने योगदान

महादेवाच्या खोऱ्यातील वनराईच्या निर्मिती व संवर्धनासाठी वनश्री जनाबापू मेहेत्रे आणि धरती बचाओ मिशन परिवाराने यापूर्वी वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, बीजसंकलन तसेच पर्यावरण जनजागृतीच्या माध्यमातून योगदान दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“आज वनराई जपूया, उद्याचे निसर्गवैभव घडवूया,” या भावनेतून देऊळगाव राजा शहर स्वच्छ, सुंदर, हरित, पर्यावरणसंतुलित आणि निरोगी राहण्यासाठी नगरपरिषदेने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा वनश्री जनाबापू मेहेत्रे यांच्यासह धरती बचाओ मिशन परिवाराने व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top