Mahabreaking

[breaking_news]

Spree of thefts:  बाळापूर, चान्नी, पातूर परिसरात चोऱ्यांचा धुमाकूळ; ग्रामस्थ भयभीत

Spree of thefts: बाळापूर उपविभागीय पोलिस कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील बाळापूर, चान्नी आणि पातूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये चोरीच्या घटनांत वाढ होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरातील दागिने व रोख रक्कम चोरीला जाण्याबरोबरच शेतातील मोटर, केबल, ठिबक सिंचन साहित्य आणि सोलर केबल चोरीच्या घटनांनी शेतकरी त्रस्त झाले आहेत. या घटनांकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन चोऱ्यांना आळा घालावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Two burglaries

  घरफोडीपासून शेतातील केबल चोरीपर्यंत; वाढत्या चोऱ्यांनी शेतकरी त्रस्त

राहुल सोनोने

वाडेगाव : बाळापूर उपविभागीय पोलिस कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील बाळापूर, चान्नी आणि पातूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये चोरीच्या घटनांत वाढ होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरातील दागिने व रोख रक्कम चोरीला जाण्याबरोबरच शेतातील मोटर, केबल, ठिबक सिंचन साहित्य आणि सोलर केबल चोरीच्या घटनांनी शेतकरी त्रस्त झाले आहेत. या घटनांकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन चोऱ्यांना आळा घालावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

वाडेगाव येथे शिक्षक सचिन लोखंडे यांच्या घरात चाकू व कोयत्याचा धाक दाखवून चोरी करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेत चोरट्यांनी लोखंडे यांच्या पत्नी व मुलासह संपूर्ण कुटुंबाला धाक दाखवत जागेवर उभे केले. त्यानंतर त्यांच्या घरातील ११ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि खिशातील १५ हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

दरम्यान, तामसी येथील शेतकरी सतीश काळे यांच्या चिंचोली शिवारातील शेतातून शेतीसाठी वापरण्यात येणारे पॉवर व्हिडरचे साहित्य चोरीला गेल्याची माहिती आहे. वाडेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक सिंचन साहित्य व केबल चोरीला जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.

चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिग्रस बु. येथे शेतातील केबल चोरीच्या घटना घडत आहेत. चरणागाव येथेही रात्रीच्या वेळी गोऱ्हा चोरीला गेल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे पशुधन चोरीच्या घटनांबाबतही ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

पातूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिग्रस खुर्द येथील शेतकरी संदीप इंगळे यांच्या शेतातील विहिरीवरील केबल चोरट्यांनी काढून त्याच ठिकाणी जाळली. त्यानंतर त्यातील तांब्याच्या तारा घेऊन चोरटे पसार झाल्याचे सांगण्यात आले.

तसेच, तांदळी मार्गावर बाळू इंगळे यांच्या शेतातील केबलही रात्रीच्या वेळी काढून जागेवरच जाळण्यात आली. त्यातील तांब्याचा भाग चोरट्यांनी लंपास केला. या प्रकारामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

हिंगणा बेलुरा मार्गावरील शेतकरी संदीप भुस्कुटे यांच्या शेतातील सोलर यंत्रणेची ५० फूट केबल तोडून नेल्याची घटना रात्रीच्या वेळी घडली. यापूर्वी मागील महिन्यातही त्यांच्या शेतात अशाच प्रकारची चोरी झाली होती. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

वाडेगाव-पातूर मार्गावरील हॉटेलमध्येही दोन वेळा चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परिसरातील अनेक चोरीच्या घटनांचा अद्याप तपास लागलेला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

अगोदरच दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना विहिरीवरील मोटर, केबल व सोलर साहित्य चोरीला गेल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या चोरीमुळे पिकांना पाणी देण्याची अडचण निर्माण होत असून शेतकरी अधिकच त्रस्त झाले आहेत.

बाळापूर, चान्नी व पातूर परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन चोरट्यांचा शोध घ्यावा. तसेच रात्रीची गस्त वाढवून चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top