Farmers watch helplessly : पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा, पिंपळगाव सोनारा आणि बाळसमुद्र येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनीही पाहणी करून शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती कृषिमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.

सोयाबीन वाळले, दाणे भरले नाहीत; सिंदखेडराजा मतदारसंघ दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी
साखरखेर्डा : पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा, पिंपळगाव सोनारा आणि बाळसमुद्र येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनीही पाहणी करून शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती कृषिमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
शेंगांमध्ये दाणे नाहीत; सोयाबीन पिकाची विदारक स्थिती
हिवरखेड पूर्णा येथील शेतकरी संदीप चव्हाण यांच्या शेतातील सोयाबीन मोठ्या प्रमाणात वाळलेले आढळले. शेंगांमध्ये दाणे अपूर्ण असून, अनेक दाणे अत्यंत बारीक असल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले. विनोद वाघ यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. परिसरातील डोंगरमाथ्यावर फेरफटका मारताना अनेक शेतांमध्ये सोयाबीन पिकाची गंभीर अवस्था असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यांतही पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी वस्तुनिष्ठ नुकसान अहवाल शासनाकडे पाठवावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे विनोद वाघ यांनी सांगितले.
सिंदखेडराजा मतदारसंघ दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी पाठपुरावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती मांडण्यात येणार आहे. सिंदखेडराजा मतदारसंघ दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी, यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे विनोद वाघ यांनी स्पष्ट केले.
पीक जाळून शेतकऱ्यांनी व्यक्त केली व्यथा
पिंपळगाव सोनारा आणि बाळसमुद्र येथेही शेतकऱ्यांनी वाळलेले सोयाबीन उपटून प्रत्यक्ष परिस्थिती दाखवली. वर्षभर मेहनत घेऊन जपलेले पीक हातातून जात असल्याच्या वेदनेतून काही शेतकऱ्यांनी सोयाबीनला आग लावून आपली व्यथा व्यक्त केली.
“शेतकऱ्याने स्वतःचे पीक जाळण्याची वेळ आली आहे, आता सरकारला आणखी कोणता पुरावा हवा?” असा सवाल शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने उपस्थित करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दुसऱ्या दिवशी सिंदखेडराजा तहसील कार्यालयात मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती समितीने दिली.
यावेळी शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे, प्रदेशाध्यक्ष गजानन जायभाय, उपप्रदेशाध्यक्ष रघुनाथजी आघाव, भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाषजी मुंडे, समिती सदस्य गजाननजी मुंडे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

