Mahabreaking

[breaking_news]

Historic Garuda idol : दीर्घकाळानंतर ऐतिहासिक गरुड मूर्तीचा शोध; सिंदखेडराजाचा पुरातन ठेवा पुरातत्त्व विभागाच्या स्वाधीन

Historic Garuda idol : मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीच्या वैभवशाली ऐतिहासिक वारशात आणखी एका महत्त्वपूर्ण ठेव्याची भर पडली आहे. येथील ऐतिहासिक गरुड मूर्तीचा दीर्घकाळाच्या प्रयत्नांनंतर शोध लागला असून, ही मूर्ती महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. त्यामुळे ऐतिहासिक व पुरातत्त्वीय वारशाच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

idol

 इतिहास अभ्यासकांच्या शोधकार्याला यश; सिंदखेडराजातील लुप्त झालेली गरुड मूर्ती उजेडात

अशोक इंगळे

सिंदखेडराजा  : मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीच्या वैभवशाली ऐतिहासिक वारशात आणखी एका महत्त्वपूर्ण ठेव्याची भर पडली आहे. येथील ऐतिहासिक गरुड मूर्तीचा दीर्घकाळाच्या प्रयत्नांनंतर शोध लागला असून, ही मूर्ती महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. त्यामुळे ऐतिहासिक व पुरातत्त्वीय वारशाच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

सिंदखेडराजा नगरीला सातवाहन, चालुक्य, यादव तसेच शिवकालीन इतिहासाचा समृद्ध वारसा लाभला आहे. या वारशातील विविध वास्तू, शिल्पे आणि ऐतिहासिक वस्तूंना विशेष महत्त्व आहे. याच ऐतिहासिक वारशाचा भाग असलेल्या गरुड मूर्तीची नोंद इतिहास अभ्यासक आर. सी. अग्रवाल यांनी १९८९ मध्ये आपल्या पीएच.डी. प्रबंधात तसेच पुस्तकात केली होती. त्यांनी या मूर्तीचे छायाचित्रही प्रकाशित केले होते. मात्र, कालांतराने ही ऐतिहासिक मूर्ती लुप्त झाली होती.

इतिहास अभ्यासकांकडून शोधकार्याला सुरुवात

सन २०२२ मध्ये स्थानिक इतिहास अभ्यासक व लेखक सुमित सुभाष खांदवे आणि मयुरेश अतुल खेकाळे यांनी या ऐतिहासिक गरुड मूर्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक वारशाचा अभ्यास करताना त्यांनी मूर्तीविषयी माहिती संकलित केली. त्यांच्या संशोधनाचा आणि शोधकार्याचा उल्लेख ‘माहेर जिजाऊंचे सिंदखेड राजा’ या प्रकाशित पुस्तकातही करण्यात आला आहे.

दरम्यान, विजय सोनुने यांनी मूर्ती सापडल्याची माहिती पुरातत्त्व विभाग आणि सिंदखेडराजा येथील संग्रहालय अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मूर्ती तशीच पडून राहिली. त्यानंतर विविध ठिकाणी मूर्तीविषयी माहिती देण्यात आली. दीर्घकाळ चाललेल्या प्रयत्नांनंतर अखेर ही ऐतिहासिक गरुड मूर्ती शोधण्यात यश आले.

पुरातत्त्व विभागाने घेतला मूर्तीचा ताबा

ऐतिहासिक व पुरातत्त्वीय वारशाचे जतन व्हावे आणि हा ठेवा पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित राहावा, या उद्देशाने संबंधितांनी मूर्ती महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाच्या स्वाधीन केली. पुरातत्त्व विभागाचे अधिकारी मयुरेश खडके आणि कर्मचारी धीरज हांडे यांनी तत्परता दाखवत मूर्ती विभागाच्या ताब्यात घेतली. यामुळे सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक वारशातील या महत्त्वपूर्ण ठेव्याच्या संरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रसंगी समाजसेवक अतुल खेकाळे, इतिहास अभ्यासक सुमित सुभाष खांदवे, पत्रकार रफिक सय्यद, पत्रकार विजय सोनुने आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुभाष खांदवे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

मूर्तीच्या मूळ स्थानाबाबत अभ्यास सुरू

सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने हा शोध महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या मूर्तीच्या योग्य मूळ स्थानाबाबत अभ्यास सुरू असल्याची माहिती इतिहास अभ्यासक मयुरेश अतुल खेकाळे यांनी दिली. ऐतिहासिक वस्तू आणि वास्तूंचे शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन करण्यासाठी स्थानिक इतिहास अभ्यासक, नागरिक आणि पुरातत्त्व विभाग यांच्यातील समन्वय महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top