municipal elections:आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये योग्य उमेदवार निवडण्याची चुरस लागली असून, योग्य उमेदवाराच्या शोधात पक्षांची अक्षरशः दमछाक होत आहे. नगराध्यक्षपद व विविध प्रभागांमधील उमेदवार ठरवताना पक्षांतर्गत मतभेद आणि गटबाजी स्पष्टपणे समोर येत आहेत.

“आपल्यालाच तिकीट मिळावे” या शर्यतीत उमेदवारांची कोलटवडी!
गजानन तिडके
देऊळगाव राजा : आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये योग्य उमेदवार निवडण्याची चुरस लागली असून, योग्य उमेदवाराच्या शोधात पक्षांची अक्षरशः दमछाक होत आहे. नगराध्यक्षपद व विविध प्रभागांमधील उमेदवार ठरवताना पक्षांतर्गत मतभेद आणि गटबाजी स्पष्टपणे समोर येत आहेत.
नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असल्याने निवडणुकीचे गणित आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. नव्याने झालेली प्रभाग रचना, स्थानिक पातळीवरील प्रस्थापित नेत्यांचा हस्तक्षेप आणि जनतेत वाढता विरोध लक्षात घेता, पक्ष नेत्यांना योग्य आणि अयोग्य उमेदवार ठरवणे कठीण झाले आहे.
प्रभागातील अनेक नागरिकांना “प्रस्थापित” नगरसेवकांविषयी नाराजी व्यक्त करताना दिसते. “विकासाच्या नावाखाली प्रभागात झालेल्या गैरव्यवहारांची जनता विसरलेली नाही,” असा सूर नागरिकांतून ऐकू येतो.
घरातीलच उमेदवारांचे ‘लॉन्चिंग’ सुरू!
शहरातील काही माजी लोकप्रतिनिधींनी पद घरातच राहावे म्हणून आपल्या कुटुंबीयांना किंवा निकटवर्तीयांना उमेदवार बनविण्याची तयारी सुरू केली आहे. सोशल मीडियावर बॅनरबाजी करून “नवख्या सदस्यांचे” प्रास्ताविक लॉन्चिंग केले जात आहे.
यामुळे पक्षांतील नव्या उमेदवारांची संधी कमी होत असून, “आपल्यालाच तिकीट मिळावे” या स्पर्धेत कोलटवडीची स्थिती निर्माण झाली आहे.
चौका-चौकात रंगली चर्चा; माजी नगरसेवकांवर टीकेचा भडिमार!
नगरपालिकेच्या मालमत्तांवरील अनियमित व्यवहार उघड झाल्यानंतर शहरात या प्रकरणावर चर्चा रंगली आहे. माजी नगरसेवकांनी पालिका मालमत्ता भाड्याने घेऊन दुसऱ्यांना देण्याच्या कथित व्यवहारांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
काही नागरिकांनी तर अशा नगरसेवकांची यादीच तयार केली असून, सोशल मीडियावरही या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे.
मतदारांचा मूड: ‘विकास नव्हे, स्वहित जोपासणाऱ्यांना जागा दाखवू!’
शहरातील विविध प्रभागांत नव्या उमेदवारांच्या बाजूने मतदारांचा कल दिसून येतो. माजी नगरसेवकांच्या कामाचा लेखाजोखा मांडताना नागरिकांनी “यावेळी बदल हवा” असा ठाम संदेश दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.
युतीचे गणित अजून धूसर
राज्य पातळीवर महायुती किंवा महाविकास आघाडी यांचे समीकरण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर युती होईल की नाही, हे सांगणे सध्या कठीण झाले आहे. अध्यक्षपद असो वा प्रभागनिहाय निवडणूक, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघेही रणनीती आखण्यात व्यस्त आहेत, मात्र परस्पर ताळमेळ मात्र अद्यापही दिसून येत नाही.

