Rain turns: सिंदखेडराजा तालुक्यात यंदा सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे विहिरीत पाणी उपलब्ध असतानाही अनियमित वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यासह राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी गुरुवारी सिंदखेडराजा येथे विविध कार्यालयांना भेटी देत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

सिंदखेडराजा तालुका कोरडा दुष्काळ घोषित करा; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी डॉ. शशिकांत खेडेकरांची प्रशासनावर धडक
अशोक इंगळे
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात यंदा सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे विहिरीत पाणी उपलब्ध असतानाही अनियमित वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यासह राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी गुरुवारी सिंदखेडराजा येथे विविध कार्यालयांना भेटी देत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
यावेळी त्यांनी उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, वीज वितरण कंपनीचे अधिकारी तसेच बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पावसाअभावी खरीप पिके करपू लागली
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये सरासरीपेक्षा सुमारे ५० टक्के कमी पाऊस झाल्याने माळरानावरील पिके करपू लागली आहेत. सोयाबीनचे पीक हातचे गेल्याची परिस्थिती निर्माण झाली असून, कपाशी व तूर पिकांनीही पाण्याअभावी माना टाकण्यास सुरुवात केली आहे.
या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन सिंदखेडराजा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा, पिकांची तातडीने पाहणी करून बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी संजय खडसे व तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
दरम्यान, ई-पिक पाहणी करताना संबंधित प्रतिनिधी फोन घेत नाहीत तसेच शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य केले जात नसल्याचा आरोप काही शिवसैनिकांनी तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे केला.
विहिरीत पाणी, पण वीजपुरवठा अनियमित
ज्या शेतकऱ्यांकडे जिरायती शेती असून विहिरींमध्ये पाणी उपलब्ध आहे, मात्र पिकांना पाणी देण्यासाठी नियमित वीजपुरवठा होत नाही, अशा शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी वीज वितरण कंपनीच्या सिंदखेडराजा येथील उपविभागीय अभियंत्यांकडे करण्यात आली.
पिके वाचविण्यासाठी सध्या पाण्याची गरज असताना वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली.
कर्जमाफीच्या प्रश्नावर बँक अधिकाऱ्यांना सक्त ताकीद
सिंदखेडराजा तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर झाली आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच नवीन अर्ज दाखल करून घेतले जात नसल्याचे आणि काही शेतकऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचेही शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.
या पार्श्वभूमीवर डॉ. शशिकांत खेडेकर यांनी बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, अशी सक्त ताकीद त्यांनी दिली. शेतकऱ्यांची अवहेलना करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन त्यांचे निराकरण करावे, अशी मागणी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विविध कार्यालयांना भेटी देऊन केली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे, संपर्कप्रमुख शिवा ठाकरे, युवासेना तालुकाप्रमुख संदीप मगर, अतिष तायडे, सुदाम काकड, श्रीनिवास खेडेकर, छोटू पवार, बाळाजी मेहेत्रे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

