Deulgaon Raja: नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती (महिला) राखीव झाल्याने गेल्या सहा-सात वर्षांपासून “आपली वेळ येईल” अशी आस धरून बसलेल्या अनेकांच्या राजकीय आकांक्षा आता पुन्हा डोकावू लागल्या आहेत. मात्र पद हाती येईल की नाही, हे पाहता काही इच्छुकांनी “प्रभागातच आपली पकड मजबूत करूया” असा निर्धार करत सोशल मीडियावर विकासाच्या घोषणांचा वर्षाव सुरू केला आहे.

आगामी निवडणुकांची चाहूल; माजी नगरसेवक व इच्छुकांमध्ये प्रचाराची लगबग, मतदार करणार खरा हिशेब
गजानन तिडके
देऊळगाव राजा : नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती (महिला) राखीव झाल्याने गेल्या सहा-सात वर्षांपासून “आपली वेळ येईल” अशी आस धरून बसलेल्या अनेकांच्या राजकीय आकांक्षा आता पुन्हा डोकावू लागल्या आहेत. मात्र पद हाती येईल की नाही, हे पाहता काही इच्छुकांनी “प्रभागातच आपली पकड मजबूत करूया” असा निर्धार करत सोशल मीडियावर विकासाच्या घोषणांचा वर्षाव सुरू केला आहे.
प्रशासक मोकळ यांचा काळ ठरला ‘विकासाचा नमुना’
शहरातील मतदारांच्या मते, नगरपालिका प्रशासन काळात मुख्याधिकारी व प्रशासक अरुण मोकळ यांनी केलेली कामगिरी भूतकाळातील अनेक माजी लोकप्रतिनिधींना मागे टाकणारी ठरली. शहरात रस्ते, जलनिस्सारण, प्रकाशयोजना आणि बाजारपेठांतील कामे प्रशासन काळात पूर्ण झाली. या कामांचा लेखाजोखा आता मतदारांच्या मनात ठसला असून, भावी इच्छुक प्रभागात फिरताना लोक त्यांना त्याची आठवण करून देत आहेत.
माजी नगरसेवकांनी प्रशासक काळात ‘मलिदा’ लाटला?
स्थानिकांच्या आरोपांनुसार, काही माजी नगरसेवकांनी प्रशासकांच्या काळात नगरपालिका ताब्यातील जागा “व्यवसायासाठी भाडेतत्त्वावर घेऊन पुन्हा इतरांना भाड्याने देऊन” आपले उखळ पांढरे केले. बसस्टँड चौक, चिखली रोड, कोंडवाडा, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर आणि आठवडी बाजारात अशी दृश्ये स्पष्ट दिसतात. त्यामुळे याच नगरसेवकांना जनता आता निवडणुकीत ‘हिशेब दे’ म्हणत आहे.
जाहीरनाम्यांची आठवण आणि मतदारांचा सवाल
प्रत्येक निवडणुकीत नगरसेवकांनी वार्डनिहाय जाहीरनामे प्रसिद्ध केले. मात्र त्या वचनांची किती पूर्तता झाली, हा प्रश्न आता मतदार त्यांच्याच समोर उपस्थित करत आहेत. “यावेळी सगळी कामं पूर्ण करू” अशा आश्वासनांवर मतदार विश्वास ठेवतील का, हे येणारा काळ ठरवेल.

