Inquiry : मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथे जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामांविषयी तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद बुलढाणा येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय संयुक्त चौकशी समिती गठीत केली आहे. चौकशी पूर्ण करून स्पष्ट अभिप्रायासह १५ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित समितीला देण्यात आले आहेत.

तक्रारीनंतर प्रशासनाची दखल; जलजीवन मिशन प्रकरणाचा १५ दिवसांत अहवाल
डोणगाव : मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथे जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामांविषयी तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद बुलढाणा येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय संयुक्त चौकशी समिती गठीत केली आहे. चौकशी पूर्ण करून स्पष्ट अभिप्रायासह १५ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित समितीला देण्यात आले आहेत.
लोणी गवळी येथील रहिवासी प्रशांत पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झालेल्या कामाबाबत प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करीत त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर दि. २७ ऑगस्टपासून त्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे.या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी चौकशीचे आदेश जारी केले.
तीन सदस्यीय समिती
या चौकशी समितीमध्ये नितेश घुसळकर, उपविभागीय अभियंता, उपविभाग बुलढाणा यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या सदस्यांमध्ये मयूर चौधरी, पीएमसी लीडर, बुलढाणा तसेच श्रीमती तरुणा पाटील, वरिष्ठ भूवैज्ञानिक, बुलढाणा यांचा समावेश आहे.
सदर चौकशी तक्रारदार व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. चौकशी समितीने संबंधित कामाशी निगडित सर्व कागदपत्रे व अभिलेख तपासावेत, आवश्यकतेनुसार संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवावेत आणि प्रकरणाचा सखोल अभ्यास करून स्पष्ट अभिप्रायासह १५ दिवसांच्या आत चौकशी अहवाल कार्यालयास सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, ही समिती दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी लोणी गवळी येथे ग्रामस्थांसमोर प्रत्यक्ष चौकशी करणार असल्याची माहिती मिळत आहे. या चौकशीतून जलजीवन मिशनच्या कामांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तक्रारींचे वस्तुनिष्ठ चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा असून, ग्रामस्थांचेही या चौकशीकडे लक्ष लागले आहे.

