Eid-e-Milad-un : ईद-ए-मिलादुन्नबीचे औचित्य साधून तालुक्यातील देऊळगाव मही येथे २६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ११४ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.

‘एका थेंबाने वाचेल जीव’; देऊळगाव महीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
गजानन तिडके
देऊळगाव राजा : ईद-ए-मिलादुन्नबीचे औचित्य साधून तालुक्यातील देऊळगाव मही येथे २६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ११४ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
नौजवान-ए-अहले सुन्नत वल जमाअत, देऊळगाव मही, रक्तप्रेमी सेवा समाज तसेच गावातील विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी आधार ब्लड सेंटर, जालना यांचे सहकार्य लाभले.
ईद-ए-मिलादुन्नबीचा धार्मिक उत्सव सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याच्या उद्देशाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, आपल्या एका रक्तदानामुळे गरजू रुग्णाचे प्राण वाचू शकतात,’ या भावनेतून युवकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
शिबिरादरम्यान रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याची आवश्यक प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. पात्र रक्तदात्यांकडून रक्तसंकलन करण्यात आले. रक्तदानाचे महत्त्व आणि गरजू रुग्णांसाठी रक्ताची असलेली गरज याबाबतही यावेळी जनजागृती करण्यात आली.
दरम्यान, शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकर्ते, स्वयंसेवक, वैद्यकीय पथक आणि सहकार्य करणाऱ्या नागरिकांनी परिश्रम घेतले. आयोजकांच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे तसेच सहकार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचे आभार मानण्यात आले.
‘आपल्या एका थेंबाने कोणाचे तरी जीवन वाचते, हीच खरी ईदची भेट,’ या मानवतावादी संदेशातून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ११४ रक्तदात्यांचा सहभाग हा देऊळगाव महीतील सामाजिक एकता, बंधुभाव आणि मानवतेच्या भावनेचा प्रेरणादायी नमुना ठरला.

