Shravani Ahire: जिद्द, चिकाटी, सातत्य आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर देऊळगाव राजा शहरातील कु. श्रावणी महेश अहिरे हिने एरोस्पेस इंजिनीअरिंगसारख्या अत्यंत आव्हानात्मक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नगरपरिषद मराठी प्राथमिक शाळेतून शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या श्रावणीने आता युनायटेड किंगडममधील नामांकित युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉल, इंग्लंड येथे एरोस्पेस इंजिनीअरिंगमधील पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळविला आहे. तिच्या या यशाने देऊळगाव राजा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

देऊळगाव राजाची लेक गाठणार आकाशाला; युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉलमध्ये मास्टर्ससाठी प्रवेश
गजानन तिडके
देऊळगाव राजा : जिद्द, चिकाटी, सातत्य आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर देऊळगाव राजा शहरातील कु. श्रावणी महेश अहिरे हिने एरोस्पेस इंजिनीअरिंगसारख्या अत्यंत आव्हानात्मक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नगरपरिषद मराठी प्राथमिक शाळेतून शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या श्रावणीने आता युनायटेड किंगडममधील नामांकित युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉल, इंग्लंड येथे एरोस्पेस इंजिनीअरिंगमधील पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळविला आहे. तिच्या या यशाने देऊळगाव राजा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सामान्य शैक्षणिक प्रवासातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणापर्यंत मजल मारणाऱ्या श्रावणीची यशोगाथा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिचे वडील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. घरातील शैक्षणिक व संस्कारक्षम वातावरणामुळे श्रावणीला लहानपणापासूनच शिक्षणाची गोडी लागली.
श्रावणीने इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण देऊळगाव राजा येथील नगरपरिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक १ येथे पूर्ण केले. त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण देऊळगाव राजा हायस्कूलमध्ये घेतले. पुढील शिक्षणासाठी तिने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तेथून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
उच्च शिक्षणाची आवड आणि एरोस्पेस क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून श्रावणीने पुढील वाटचाल केली. तिने व्हीआयटी भोपाळ येथून एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये चार वर्षांची बी.टेक. पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली. अभियांत्रिकी शिक्षणादरम्यान तिने सातत्याने मेहनत घेत एरोस्पेस क्षेत्रातील ज्ञान व कौशल्य विकसित केले.
बी.टेक. पूर्ण केल्यानंतर श्रावणीने आता परदेशात उच्च शिक्षणासाठी मोठी झेप घेतली आहे. युनायटेड किंगडममधील इंग्लंड येथे असलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉलमध्ये तिला एम.एस्सी. इन एरोस्पेस इंजिनीअरिंग या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे.
नगरपरिषद शाळेतील प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षण संस्थेपर्यंत पोहोचलेला श्रावणीचा प्रवास विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. योग्य दिशा, सातत्यपूर्ण परिश्रम आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे तिने आपल्या यशातून दाखवून दिले आहे.
एरोस्पेस इंजिनीअरिंगसारख्या उच्च आणि आव्हानात्मक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून परदेशात पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल श्रावणीवर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्थानिक नागरिक, शिक्षकवर्ग, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून तिचे कौतुक करण्यात येत असून, देऊळगाव राजा शहरातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

